एकदा प्रवासातून घरी येत असताना खूप भूक लागली होती. घरी आल्यावर जेवायचे होते. एका तासाच्या अंतरावरच घर होते. तेवढ्यात बासुंदी शब्द असणारा एक फलक दिसला. त्या ठिकाणी आमची गाडी आपोआप थांबली. हॉटेलमध्ये गेलो. बासुंदी खाल्ली. बासुंदी खाण्यासाठी फारशी गर्दी नव्हती. आपल्याला वाटेल बासुंदीचा भाव जास्त असेल म्हणून तेथे फारशी गर्दी नसेल. दहा रुपयांच्या चहाइतकी बासुंदी १२ रुपयाला मिळाली. दहा रुपयांचा चहा आपण पितो. तेवढ्या आकाराच्या कपामध्ये त्यांनी बासुंदी दिली. हे आपल्याला आवर्जून सांगायचे आहे. आम्ही सर्व जणच तृप्त झालो. आमच्या तृप्तीचा अनुभव इतरांनाही यावा असे वाटले. प्रत्येकाची तृप्तीची ठिकाणे वेगवेगळी आहेत. काही माणसे धुंद अशा ठिकाणी गर्दी करतात.
मनात विचार सुरू झाला. अशाप्रकारची बासुंदी पुन्हा पुन्हा मिळाली पाहिजे. अनेक ठिकाणी प्रवासाच्या निमित्ताने जेव्हा फिरत असतो, त्यावेळी अशी बासुंदी कुठेच खायला मिळाली नाही. उजनीसारख्या काही ठिकाणी बासुंदी मिळते. आश्चर्य वाटते. भारतात कुठेही फिरले तर चहा प्यायला मिळतो. जिकडे तिकडे चहा विकणारी माणसं दिसतात. त्या त्या ठिकाणी चहा पिणाºयांची गर्दी सुद्धा पाहायला मिळते. या देशात दारूही सर्वत्र प्यायला मिळते. अशा ठिकाणी न बोलावता लोक गर्दी करतात. जगद्गुरू तुकारामांचा एक अभंग याठिकाणी लोक तंतोतंत पाळतात. ‘तुका म्हणे तेथे, न पाचारिता जावे’ हा अभंग संत, सद्गुरू, भगवंताच्या दर्शनासाठी तसेच सत्कर्मासाठी वापरलेला आहे. पण गंमत आहे धार्मिक कार्यक्रमांमध्ये लोक कमी प्रमाणात येतात. पण नेमके आमचे तरुण न बोलवता जिथे आपल्या आयुष्याची राखरांगोळी होणार आहे त्या ठिकाणी जातात.
चहा आणि दारू विक्री केंद्रांवर न बोलविता गर्दी करणारा आपला मित्रवर्ग आहे. चहामुळे नेमका काय फायदा होतो पिणाºयांना माहीत. बासुंदी, लिंबू सरबत शरीराला अत्यंत उपायकारक असतात. हे पदार्थ जागोजागी मिळत नाहीत. एकदा संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावरून जात असताना एका दुकानासमोर खूप गर्दी दिसली. आश्चर्य वाटले. काहीतरी घडल्यासारखं वाटत होतं. तिथून त्या गर्दीमुळे माझी मोटरसायकल पुढे जातच नव्हती. चौकशी केली. कशाची गर्दी आहे. तेव्हा एकाने सांगितले तिथे वाईन शॉप आहे. दारू घेण्यासाठी लोकांची एवढी गर्दी झालेली आहे. खूप वाईट वाटलं. बासुंदी खाण्यासाठी जेव्हा गेलो होतो तिथे मात्र माझ्या गाडीतील माझे कुटुंबीय होते. फारशी गर्दी नव्हती. माणसाच्या अज्ञानामुळे माणूस नको तिथे गर्दी करतो. जिथे जाणं आवश्यक आहे तिथे तो जात नाही. जिथे जाण्याने त्याच्या आयुष्याची राखरांगोळी होते. तिथे मात्र तो आवर्जून जातो. हे त्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे.
माणसाने काय खावे, काय प्यावे याविषयी आहारतज्ज्ञांनी सुंदर चिंतन लिहिले आहे. ते वाचायला आम्हाला वेळ नाही. एखादा आजार झाल्यानंतर आम्ही त्याचा विचार करतो. परमेश्वराने सृष्टीची रचना करताना अतिशय चांगले नियोजन केले आहे. काही सजीव शाकाहारी तर काही मांसाहारी. शाकाहारी प्राणी मांसाहार करत नाहीत तर मांसाहारी प्राणी शाकाहार करत नाहीत. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे तो मांसाहार आणि शाकाहार दोन्ही करतो.
हॉटेलचे मालक अनंत गुरव यांच्याशी बोललो. अतिशय प्रतिकूलतेत हा व्यवसाय चालवतात. यामध्ये त्यांना कमी नफा मिळतो. जास्त नफा मिळविणारे इतर खाद्य किंवा पेय ते विकत नाहीत. तरुणांना उपयोगी पडणारे खाद्य देऊन समाजासमोर एक आदर्श त्यांनी उभा केला. नवीन उद्योजकांना या निमित्ताने सांगावेसे वाटते, या देशात बासुंदी खाणारे, लिंबू सरबत पिणारे शेकडो लोक आहेत. त्यांच्यासाठी अशाप्रकारचे बासुंदी, लिंबू तसेच इतर फळांचे सरबत विक्री केंद्र सुरू झाले पाहिजेत.- डॉ. अनिल सर्जे(लेखक संगीत क्षेत्रात अभ्यासक आहेत.)