वैराग : तुळजापूर आणि वैराग - माढा हा रस्ता अनेक वर्षांपासून नादुरुस्त झालेला असून, तो लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी वैराग तालुका विकास आघाडीचे निमंत्रक किशोर देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
वैराग-तुळजापूर व माढा हे दोन रस्ते २० वर्षांपूर्वी तयार करण्यात आले आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी खचला आहे; परंतु वर्षानुवर्षं हे खड्डे फक्त बुजवण्याचेच काम झाले. तसेच तुळजापूर रोड तर दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पावसात मालेगावजवळ अक्षरश: दोन किलोमीटर वाहून गेला आहे. तरीदेखील प्रशासनाला जाग का येत नाही, असा सवाल देशमुख यांनी केला आहे.
मुंबई, पुणे येथून तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा, अणदूर येथे जाण्यासाठी नागरिकांना हा मार्ग जवळचा आहे. यामुळे सुमारे २० किलोमीटर अंतर कमी होते. वैराग - माढा रोडवर काम करण्याकरिता खडी, डस्ट आणून टाकली होती. मात्र काम न करता ठेकेदाराने ती उचलून नेल्याने हे काम रखडले आहे. दरम्यान, वैराग-तुळजापूर रस्त्याचे मालेगावपासून रूंदीकरण व नूतनीकरणाचे काम सुरू झाले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेही बंद झाले. संबंधितांनी मंत्रालयाशी वारंवार पत्रव्यवहार केला, पण चौकशी करू हेच उत्तर मिळत राहिले.