तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे.कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.
तुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते.
हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यत: द्वादशीला करतात. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे.हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते.
- मोहन दाते, सोलापूर