आॅनलाइन लोकमत सोलापूरमाळीनगर : राजीव लोहकरे/शहाजी फुरडे-पाटील/ संतोष बडे सकाळच्या उत्साही वातावरणात अकलूजच्या प्रस्थानानंतर अगदी जवळच ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात व फुगडी मनोरे आदी ग्रामीण खेळांचा आनंद घेत माळीनगर येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पार पडले. तुकोबांचा व स्वारीचा या दोन्ही अश्वानी एक फेरी मारून रिंगण पूर्ण केले.आज सकाळी सात वाजता पालखी सोहळा अकलूजचा मुक्काम संपवून माळीनगरकडे मार्गस्थ झाला. वाटेत मुक्कामी असलेल्या दिंड्या रोडवर येऊन सहभागी होत होत्या. सोहळा कर्मवीर चौकात आल्यावर त्याठिकाणी आरती करण्यात आली. तोपर्यंत माळीनगर येथे प्रशासनाच्या वतीने रिंगणाची तयारी पूर्ण केली होती. बरोबर ८़३० वाजता अश्व व नगारागाडीचे आगमन झाले. मॉडेल प्रशालेजवळ अश्व जाऊन थांबले. तोपर्यंत काका चोपदार, पालखी सोहळा प्रमुख अभिजित मोरे, सुनील मोरे, प्रीतम मोरे यांनी दिड्यांचे रिंगण लावून पूर्ण केले होते. प्रत्येक दिंड्यातील वारकरी माऊली-तुकाराम असा जयघोष करीत व अभंग म्हणत बेभान होऊन विठू नामात तल्लीन होत अश्वाची वाट पाहत होते़ रथापुढील दिंडी क्रमांक १ पासून सुरुवातीला बाभूळगाव करांचा अश्व धावला, रथाच्या पुढे जाऊन तो तिथे थांबेपर्यंत पाठीमागून स्वरांचा अश्व धावला. रथाजवळ थांबून दोन्ही अश्वानी पादुकांचे दर्शन घेतले व परत पुन्हा त्याच वेगाने अश्व धावत नगारा गाडीकडे आले. त्यावेळी उपस्थित वारकरी व नागरिकांनी माऊली-तुकाराम असा जयघोष करीत घोड्याच्या टाफाखालील माती आपल्या कपाळी लावण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर दिंडीतील वारकऱ्यांनी विविध खेळांचा आनंद घेत पहिल्या विश्रांतीकडे मार्गक्रमण केले.----------------------------सरपंचांनी केले स्वागतमाळीनगर येथे पालखीचे आगमन होताच सरपंच आशा सावंत, उपसरपंच बाळासाहेब वजाळे, साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे, विलास इनामके यांनी पालखीचे स्वागत केले. प्रभाकर रासकर व प्रमिला रासकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.---------------------मुक्कामासाठी बोरगावलावारीमध्ये दररोज चालत असताना वारकऱ्यांचा शिणवटा घालवण्यासाठी गोल, उभे रिंगण, धावा असे उपक्रम राबवले जातात. रिंगण झाल्यानंतर दुपारी बारा वाजता सोहळा महाळंूग कडे मार्गस्थ झाला.पालखी सोहळा महाळूगमार्गे बोरगावात मुक्कामी थांबला.
माळीनगर येथे पार पडले तुकोबारायांचे पहिले उभे रिंगण
By admin | Published: June 30, 2017 1:17 PM