सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोलापूरच्या पार्क मैदानावर सभास्थळी आगमन होताच क्षणभराचाही वेळ न दवडता सभा सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हार, बुके अथवा फुले न देता मोदींच्या हाती थेट शतकापूर्वीची हस्तलिखित भगवद्गीता दिली. खांद्यावर घोंगडे घातले, डोक्यावर पुणेरी पगडी ठेवली अन् दुसऱ्या हातात म्यान केलेली तलवार दिली. पंतप्रधानांनी तलवार उंच करून अभिवादन केलं तेव्हा स्टेडियम ‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी दुमदुमून गेले.
मोदी यांच्या स्वागतासाठी एकीकडे भाजप कार्यकर्ते, रे नगर वसाहतीचे लाभार्थी यांच्यामध्ये उत्साह असताना विविध मागण्यांसाठी काही संघटनांनी आंदोलनाचाही पवित्रा घेतला होता. काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, स्थानिक नेते मोदींना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते; पण पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना वेळीच ताब्यात घेतले. रिमोटची कळ दाबून मोदी यांनी तीस हजार घरांच्या वसाहतीचे भूमिपूजन आणि विकासकामांचे उद्घाटन केले.
मोदी यांनी भाषणाची सुरवात मराठीतून केली. लाखो वारकºयांचे आरध्य दैवत असलेले श्री विठ्ठल-रुक्मीणी, सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि मंगळवेढ्याचे श्री दामाजीपंत या सर्वांना मी नमस्कार करतो, असे मोदी म्हणाले.सवर्णांना दहा टक्के आरक्षण देणाºया विधेयकाचा उल्लेख करून हे ऐतिहासिक विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याचे सांगितले अन् राज्यसभेतील मंजुरीबाबत आशा व्यक्त केली. ते म्हणाले, या विधेयकावरून विरोधक दिशाभूल करीत आहेत. आदिवासी व इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या प्रमाणामध्ये कपात करून ते इतरांना देण्यात येईल, असा खोटा आरोप होत आहे; पण आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लावू शकणार नाही, असेही ते म्हणाले.तुळजाभवानीचे दर्शन सुखकर होईल!मोदी यांनी सोलापूर ते उस्मानाबाद व्हाया तुळजापूर या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याचे सांगितले. ते म्हणाले की, हा रेल्वे मार्ग तुळजाभवानीच्या आशीर्वादाने लवकरच पूर्ण होणार आहे. या मार्गामुळे महाराष्टÑातील भाविकांना तुळजाभवानीचे दर्शन घेणे सुखकारक होईल.