सोलापूर : धार्मिक पर्यटनासाठीसोलापूर जिल्हा ओळखला जातो. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सध्या धार्मिक स्थळे बंद आहेत; मात्र रोज सुमारे ८०० सोलापूरकर हे तिरुपती बालाजी येथे जात आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यापासून तिरुपती बालाजी येथे जाण्याचे प्रमाण वाढतच आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला ही माहिती मिळाली.
पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर ही धार्मिक पर्यटन स्थळे सोलापूरच्या जवळ आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मागील सात महिन्यांपासून मंदिरे बंद आहेत. यामुळे जिल्ह्यात होणारे धार्मिक पर्यटनही बंद आहे. या परिस्थितीत सोलापूरकर हे तिरुपती बालाजी देवस्थानला जाण्यास पसंती देत आहेत. सोलापूर-हैदराबाद रस्ता चांगला तयार झाला आहे. तर उद्यान एक्स्प्रेसचीही सोय असल्याने सोलापुरातून तिरुपती बालाजी मंदिराचे दर्शन घेणे सोयीचे झाले आहे.
जून महिन्यापासून लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यास सुरुवात झाली. जूनमध्ये रोज २०० भाविक, जुलैमध्ये ५००, आॅगस्टमध्ये ६०० तर सप्टेंबरमध्ये रोज ८०० भाविक जात आहेत. यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भाविकांचाही समावेश आहे. आॅक्टोबर महिन्याचे बुकिंग सुरु झाले असून या महिन्यात अधिक लोक जाण्याची शक्यता असल्याचे सोलापुरातील तिरुमला तिरुपती देवस्थानचे काऊंटर आॅपरेटर सिद्राम उपलंची यांनी सांगितले.
धार्मिक पर्यटनातून निसर्ग पर्यटन शहर व जिल्ह्यामधून अनेक लोक पर्यटनाला जात असतात. साधारणपणे धार्मिक पर्यटनातून निसर्ग पर्यटन करण्याकडे सोलापूरकरांचा ओढा आहे. धार्मिक पर्यटन करताना त्या स्थळाच्या आसपास असलेल्या नैसर्गिक ठिकाणी जाऊन आपला क्षीण घालवण्यास पसंती देतात. एखाद्या धार्मिक ठिकाणी जायचे असेल तर वाटेत येणारे नैसर्गिक स्थळ पाहणे हे जास्त सोयीचे होते. त्यामुळे निसर्ग आणि धार्मिक पर्यटनाचा सुंदर असा मिलाफ घालण्याचा प्रयत्न केला जातो, अशी माहिती टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी दिली.
सोलापूरकर अष्टविनायक, साडेतीन शक्तीपीठ, गोवा, कोकण, महाबळेश्वर, लोणावळा, कोल्हापूर, गणपती पुळे आदी ठिकाणी जास्त भेटी देतात. मालवण येथे पर्यटनाच्या दृष्टीने चांगली कामे होत असल्याने तिथे देखील लोक जात आहेत. सध्या कोविडमुळे गाड्या जागेवरच थांबल्या आहेत. शासनाने परवानगी दिल्यास पुन्हा एकदा पर्यटन सुरु करता येईल.- जगदीश चडचणकर
मागील दोन वर्षांपासून केरळमधील वायनाड, अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय येथे सोलापूरकर भेट देत आहेत. जे नेहमी बाहेर फिरतात त्यांना सतत नवे पाहण्याची इच्छा असते. त्यामुळे आता ईशान्य भारताकडे पर्यटन वाढले आहे. सध्या हिमाचल, राजस्थान आणि कर्नाटक येथील पर्यटन क्षेत्र खुले झाले आहे. काही अटींसह तशी परवानगी महाराष्ट्रातही द्यावी.- प्रवीण वैद्य