मोसमी पावसापूर्वी पडला जाणारा वळवाचा पाऊस यंदा पडणार का, याकडे बळीराजाचे डोळे लागले होते. मात्र, नुकत्याच सुरू असलेल्या चक्रीवादळामुळे पावसाने तालुक्यात हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेली उष्णता व उकाड्यामुळे ग्रामीण भाग हैराण झाला होता. गेल्या दोन दिवसांत झालेल्या हवामानातील बदलामुळे जोराचे वारे वाहत असून, पावसाने सुरुवात केली आहे. पावसाचे पडलेले पाणी सकाळपर्यंत शेतातून गायब झाले होते. मात्र, सुरुवात झाल्यामुळे दमदार पाऊस पडेल या अपेक्षेने बळीराजा सुखावला आहे.
अन् धावपळ उडाली
अर्धवट पडलेली शेतीची कामे सुरू असतानाच अचानक हवामानात बदल झाला. वारा अन् पावसाने सूर धरताच जनावरांचा चारा व शेतशिवारात पावसामुळे नुकसान होईल अशा वस्तू झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. तालुक्यात १६ मे रोजी माळशिरस १० मि.मी., सदाशिवनगर १० मि.मी., इस्लामपूर ०८ मि.मी., नातेपुते ०२ मि.मी., दहीगाव ०५ मि.मी., पिलीव ०४ मि.मी., वेळापूर १८ मि.मी., महाळुंग १६ मि.मी., अकलूज २६ मि.मी., लवंग ११ मि.मी., असा ११० मि.मी., तर सरासरी ११ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.