दर रविवारी भरणारा सांगोला येथील जनावरांचा बाजार सुरू झाल्याने या बाजारावर अवलंबून असलेल्या सर्वच उद्योग व्यवसायांना चालना मिळाल्याने व्यापारी, दुकानदार, चहा विक्रेते, हाॅटेल व्यावसायिक, रसपानगृह चालक, वाहन चालक- मालकांतून समाधान व्यक्त होत आहे. या जनावरांच्या बाजारावर शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह होत आहे.
कोरोनाचे संकट आणि लंपी स्किन आजारामुळे सांगोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर रविवारी भरणारा जनावरे, शेळ्या-मेंढ्याचा बाजार जवळपास ८ ते ९ महिने बंद होता. त्यामुळे शेतकरी, व्यापारी यांच्यासह जनावरांच्या बाजारावर अवलंबून असणाऱ्या सर्वांचेच आर्थिक नियोजन कोलमडले होते. गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून सुरू झालेला जनावरांचा बाजार आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे.
बाजारात १५०० जनावरे, ७०० शेळ्या मेंढ्यांची आवक
रविवार १७ जानेवारी रोजी भरलेल्या जनावरांच्या बाजारात गाय, बैल, म्हैस अशी लहान-मोठी दीड हजार जनावरे तर ७०० शेळ्या-मेंढ्यांची आवक झाली होती. रविवारचा शेळ्या-मेंढ्यांसह जनावरांचा बाजार सुरू झाल्यामुळे बाजारात व्यापारी, शेतकरी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. या बाजारात १८५ गायींची २१ ते ८० हजार रुपयांपर्यंत, २९६ बैलांची १८ ते ६५ हजार रुपयांपर्यंत, १२९ म्हशींची २३ ते ७७ हजार रुपयांपर्यंत अशा ६१० जनावरांची खरेदी विक्री झाली. तर ३२० शेळ्यांची ७ हजारांपासून ते १३ हजार रुपयांपर्यंत, २० मेंढ्यांची ९ ते १४ हजार ५०० रुपयांपर्यंत अशी ३४० शेळ्या-मेंढ्याची खरेदी-विक्री झाल्याने एकूण ९५० लहान-मोठी जनावरे, शेळ्या- मेंढ्याच्या खरेदी- विक्रीतून सुमारे ६० लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे सचिव खंडेराव पडळकर यांनी सांगितले.