सोलापूर : कोरोनामुळे यंदा ‘सीबीएससी’ने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. ‘सीबीएसई’च्या पावलावर पाऊल ठेवत राज्य शासनानेही दहावी परीक्षा रद्द केली सोबतच आता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत; पण मुलांनी परीक्षा रद्द होणार, याचा आधीपासूनच अंदाज बांधून ‘नीट’ची तयारी सुरू केली.
कोरोनामुळे राज्य शासनाने बारावीच्या परीक्षा तीनवेळा पुढे ढकलल्या. यामुळे बारावीचे विद्यार्थी मागील जवळपास दीड वर्षांपासून बारावीचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला झाल्याने यंदा विद्यार्थ्याची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच परीक्षा रद्द करण्यात आले आहे तरी बहुतांश विद्यार्थी ही परीक्षा रद्द करण्याच्या बाजूने असून परीक्षा रद्द करायचे असतील तर अगोदर जाहीर करणे गरजेचे होते, असे मत त्यांच्याकडून व्यक्त केले जात आहे.
बारावी बोर्डाच्या परीक्षांबाबत आणि प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी बारावीसोबत इतर परीक्षा जसे की ‘नीट’ आणि जेईईचा अभ्यास पूर्वीपासूनच सुरू केला होता. त्यामुळे बारावीचे टक्केवारी जरी कमी असले तरी पुढील शिक्षणावर जास्त परिणाम होणार नाही, असे काही विद्यार्थ्यांचे मत आहे.
माझी बारावीची परीक्षा ही शिक्षणाची महत्त्वाची पायरी असली तरीही सध्याची परिस्थिती पाहता परीक्षा रद्द होणे गरजेचे होते. विद्यार्थीचे आरोग्याचे काळजी आणि सुरक्षिततेला प्राथमिकता असली पाहिजे. यामुळे घेतलेले निर्णय चांगलाच आहे. परीक्षेच्या संभ्रमावस्थेमुळे माझ्या मनात तणाव होता, पण परीक्षा रद्दमुळे थोडी नाराजी आहे.
सृष्टी स्वामी, विद्यार्थिनी
कोरोनाचा नवीन प्रतिरूप हा लहान मुलांना धोकादायक असल्यामुळे परीक्षा रद्द होणे आरोग्यसाठी चांगले होते. सोबतच १८ वर्षांच्या आतील मुलांना लसीकरणाची संधी नसल्यामुळे त्यांना परीक्षा देणे हे जास्त धोकादायक होते; पण परीक्षा रद्द करून शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. बारावीचा टक्केवारीवर जरी परिणाम पडत असला तरी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करायचा असल्यामुळे त्याचा अभ्यास पूर्वीपासून सुरू केलेला आहे.
मृणाल काळे, विद्यार्थिनी
तर ताण कमी झाला असता!
आरोग्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा रद्द होणे हे गरजेचे होते. शासनाचा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय चांगला आहे. पण परीक्षा रद्द करायचे असतील तर पूर्वीच त्यांनी याबाबतची घोषणा करायला हवी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण थोडा कमी झाला असता, असे मत प्राचार्य गणेश देशपांडे यांनी व्यक्त केले.