राजकुमार सारोळे सोलापूर : जिल्हा परिषदेतील पक्षनेतेपदाचा वाद सलग पाचव्या दिवशीही कायम राहिला. प्रशासनाने काढलेले दुरूस्तीपत्र न स्वीकारता मंगळवारी पुन्हा अण्णाराव बाराचारे हे पक्षनेत्याच्या कार्यालयात येऊन बसले तर आनंद तानवडे यांनी अध्यक्ष व विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात बैठक मारली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांच्या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांना पक्षनेते कार्यालयाचा ताबा घेण्याबाबत बाराचारे यांच्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी काढलेले पत्र रद्द करण्याची सूचना केली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी हे पत्र काढले व लिपिक पत्र घेऊन आल्यावर बाराचारे यांनी स्वीकारलेच नाही. हे पत्र रद्द करण्याबाबत अक्कलकोटहून मुख्य कार्यकारी अधिकाºयांना फोनाफोनी झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रात्री साडेनऊ वाजेपर्यंत कोणता निर्णय घ्यावा, या विवंचनेत प्रशासन होते. मुख्य कार्यकारी अधिकारी निघून गेल्यावर रात्री साडेदहा वाजता बाराचारे जिल्हा परिषदेतून निघून गेले.
त्यानंतर मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजता बाराचारे पुन्हा पक्षनेते कार्यालयात येऊन बसले. शिवानंद पाटील अगोदरपासून त्यांच्या प्रतीक्षेत होते. सकाळी मतदारसंघातील कार्यक्रमाला हजेरी लावली, त्यानंतर मोकळा झाल्यावर जिल्हा परिषदेत आल्याचे त्यांनी सांगितले.
आनंद तानवडे हे मात्र दुपारी एक वाजता जिल्हा परिषदेत आले. त्यांनी काही काळ विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांच्या केबिनमध्ये बसून गप्पा मारल्या, त्यानंतर अध्यक्ष कांबळे यांच्या केबिनमध्ये बैठक मारली. दिवसभर हे नाट्य सुरूच राहिले. मात्र प्रशासनाने कोणतीच भूमिका घेतली नसल्याचे दिसून आले. अध्यक्ष कांबळे यांनीही आजच्या घडामोडींवर बोलणे टाळले व योग्य वेळ आल्यावर निर्णय घेऊ, असे सूचित केले.
देशमुख म्हणाले आमचा काय संबंधया घडामोडींबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांना विचारले असता, जिल्हा परिषदेत समविचारी आघाडीची सत्ता असून, अध्यक्ष शिवसेनेचा आहे. त्यामुळे या निवडीत आमचा काय संबंध, अशी प्रतिक्रिया दिली. पदाधिकारी निवड प्रक्रियेत असलेले नेतेच याबाबत निर्णय घेतील. याबाबत अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सोलापुरात आले तेव्हा भाच्याच्या लग्नासाठी मी बंगळुरूमध्ये होतो, त्यानंतर त्यांची भेट झाली, पण जिल्हा परिषदेतील घडामोडींबाबत आमची काहीही चर्चा झालेली नाही.
साठे म्हणाले मी आता जातो...पक्षनेतेपदावरून भाजपमध्ये सुरू असलेल्या गोंधळाची जिल्हा परिषदेत चर्चा सुरू आहे. पक्षनेत्याबरोबर विरोधी पक्षनेताही बदलण्याची चर्चा आहे, असे म्हणताच बळीराम साठे म्हणाले, अध्यक्षांनी मला आता सांगावे, मी कार्यालय सोडून जाण्यास तयार आहे. पदाबाबत मला अपेक्षा नाही. पक्षनेता, विरोधी पक्षनेता निवडीचा अध्यक्षांना अधिकार आहे. अद्याप त्यांनी काहीही न सांगितल्याने मी विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात आहे.