सोलापूरच्या वीस मुलांनी केली बॉर्डर पार; मायदेशी येण्यासाठी रोमानिया, हंगेरीत प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 05:26 PM2022-03-04T17:26:09+5:302022-03-04T17:26:15+5:30

संपर्क साधण्यासाठी दिले सिम : राहण्या-खाण्याची झाली उत्तम व्यवस्था

Twenty children from Solapur cross the border; Waiting in Romania, Hungary to return home | सोलापूरच्या वीस मुलांनी केली बॉर्डर पार; मायदेशी येण्यासाठी रोमानिया, हंगेरीत प्रतिक्षा

सोलापूरच्या वीस मुलांनी केली बॉर्डर पार; मायदेशी येण्यासाठी रोमानिया, हंगेरीत प्रतिक्षा

Next

सोलापूर : युक्रेनमधील बंकरमध्ये अडकलेल्या सोलापूरच्या २० मुलांना युद्धग्रस्त युक्रेन देश सोडण्यात यश आले आहे. बुधवारी (दि. २) सकाळी बसमधून निघालेल्या विद्यार्थ्यांनी सुखरूपरीत्या बॉर्डर पार केली. एकूण २० विद्यार्थ्यांपेकी १२ विद्यार्थी हे रोमानियात, तर ८ विद्यार्थी हे हंगेरीमध्ये दाखल झाले आहेत. एक विद्यार्थी रोमानियातून विमानाने निघाला आहे.

विद्यार्थ्यांनी रोमानियाची बॉर्डर ओलांडून ६० किलोमीटर आत प्रवेश केला आहे. विद्यार्थ्यांची राहण्याची चांगली सुविधा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे विविध ग्रुप तयार करून त्यांना कॅम्पमध्ये राहण्यास सांगितले आहे. ४५० किलोमीटर अंतरावर विमानतळ आहे. जोपर्यंत विमानाचे वेटिंग संपणार नाही, तोपर्यंत त्यांना तिथेच राहावे लागणार आहे.

सोलापूरचे विद्यार्थी रोमानियात पोहोचल्यानंतर त्यांना कोणतीही अडचण आली नाही. काही विद्यार्थ्यांना तर रोमानियातून फोन करण्यासाठी सिमकार्ड देण्यात आले. खाण्यासाठी काही हवे, नको याची आस्थेने विचारणा करण्यात येत होती.

----

रोमानियाच्या नागरिकांचे सहकार्य

युक्रेनध्ये भारतीय विद्यार्थी अडकले असताना त्यांना भाषेच्या अडचणी आल्या. मात्र, रोमानियातील नागरिकांना इंग्रजी चांगले येत असल्याने संवाद साधता आला. कॅम्पमध्ये जागा अपुरी पडल्याने तिथल्या नागरिकांनी आपल्या घरात विद्यार्थ्यांना आसरा दिला.

-----

पंढरपूरचा प्रसाद आज भारतात येणार

पंढरपूरचा प्रसाद भाऊसाहेब शिंदॆ हा सोमवारी (दि. २८) रोमानिया येथे पोहोचला. तिथून त्याला रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथे नेण्यात आले. तिथे तयार करण्यात आलेल्या कॅम्पमध्ये त्याच्या राहण्याची व्यवस्था केली होती. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो भारतात येण्यासाठी विमानाने रवाना झाला. त्याच्यासोबत मिरजेचा मित्र असून दोघे आज, शुक्रवारी मुंबईत पोहोचतील. तिथून कारने तो पंढरपुरात येणार आहे.

 

Web Title: Twenty children from Solapur cross the border; Waiting in Romania, Hungary to return home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.