सांगली : वसंतदादा साखर कारखान्यातून सेवानिवृत्त झालेल्या बाराशे कामगारांना गेल्या आठ वर्षात ग्रॅच्युईटीची रक्कमच मिळालेली नाही. या रकमेबद्दल कामगारांनी साखर कारखाना प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांकडे मागणी केली, तर त्यांच्याकडून दाद दिली जात नाही. यामुळे उतारवयात या कामगारांची आर्थिक गोची झाली असल्याच्या कामगारांच्या तक्रारी आहेत.आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना म्हणून कधीकाळी नावलौकिक मिळविलेला वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला आहे. गत गळीत हंगामातील गाळप केलेल्या उसाची वीस ते पंचवीस कोटींची देणी अद्याप दिलेली नाहीत. उसाची बिले भागविण्यासाठी साखर आयुक्तांच्या आदेशाने मिरज तहसीलदारांनी कारखान्याला मालमत्ता जप्तीची नोटीसही बजावली आहे. त्यातच साखर गोदामालाही सील ठोकण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या देण्यांसोबतच जिल्हा बँकेचे ७८ कोटींचे कर्ज कारखान्यावर आहे. सेवानिवृत्त कामगारांचा थकित पगार आणि ग्रॅच्युईटीच्या रकमेचे कोट्यवधी रुपये देणे बाकी आहेत. सेवानिवृत्तीला आठ वर्षे होऊनही बाराशे कामगारांना ग्रॅच्युईटीचीही रक्कम मिळालेली नाही. याबद्दल कामगार साखर कारखान्याकडे फेऱ्या मारून दमले, तरीही कोणी दाद देत नसल्याच्या कामगारांच्या तक्रारी आहेत. साखर कामगारांच्या संघटनाही या प्रश्नावर आवाज उठवत नसल्याच्या सेवानिवृत्त कामगारांच्या तक्रारी आहेत. (प्रतिनिधी)
‘वसंतदादा’चे बाराशे सेवानिवृत्त कामगार ग्रॅच्युईटीपासून वंचित
By admin | Published: December 25, 2014 10:46 PM