अक्कलकोट : तोरणी (ता.अक्कलकोट) येथे एका शेतकऱ्याच्या शेतात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर अक्कलकोट पोलिसांनी धाड टाकून लिंबाच्या झाडाखाली गोलाकार करुन पत्ते खेळणाऱ्या ११ जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणात दक्षिण पोलीस पोलिसांनी २ लाख २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला.
१५ मे रोजी सायंकाळी सव्वापाच वाजता पोलिसांनी ही धाड टाकली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार तोरणी शिवारात जलील लोणी यांच्या शेतामध्ये एका कडुलिंबाच्या झाडाखाली काहीजण तीन पत्याचा जुगार खेळत असल्याची माहिती नूतन पोलीस निरीक्षक गवळी यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले. या धाडीत आरोपी धानप्पा गुडडद, महमद हंनुरे, सिद्धरुढ येळसंगी, मुनीर भललेभारी, फिरोजमिया बेपारी, महंमदहनिफ रुस्तुम, खाजा कुरेशी (सर्व रा. मैंदर्गी ता.अक्कलकोट), रियाज रुस्तुम, मारुती पुजारी, आरिफ शेख, एक अनोळखी व्यक्ती अशा ११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या आरोपींकडून चार मोटरसायकली, मोबाईल व रोख रक्कम जप्त केले असून २ लाख २४ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक एस. आर. काळे, पोलीस नायक सुभाष दासरी, पोलीस कॉन्स्टेबल जगदीश राठोड, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सिकंदर मुल्ला, महादेव शिंदे, अजय शिंदे यांच्या पथकाने केली आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत जवळगे यांनी यांनी फिर्याद दिली आहे.