सोलापूर - मानसिक व शारीरिक छळ करून सतत हुंड्याची मागणी करून विवाहित महिलेचा दोन वेळा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पतीसह सासू, सासरे, नणंद, नणंदेच्या पतीविरोधात जेलरोड पोलिस ठाण्यात रविवार १५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्चना सुशांत आडकी (वय ३०, रा. गणेश पेठ, हिंगुलांबिका मंदिरासमोर, सोलापूर, सध्या दत्तवाडी, आकुर्डी, संजीवनी निवास, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुशांत आडकी (पती), श्रीनिवास आडकी (सासरे), राधाबाई आडकी (सासू), सुनीता गवनी (नणंद), हरीनाथ गवनी (नणंदेचे पती) सर्वजण रा. गणेश पेठ, हिंगुलांबिका मंदिरासमोर, सोलापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, १ एप्रिल २०२० ते २४ जुलै २०२३ या कालावधीत अर्चना आडकी या विवाहित महिलेचा सासरी नांदत असताना पती, सासू, सासरे, नणंद व नणंदेचे पती यांनी मानसिक व शारीरिक छळ केला. याशिवाय वेगवेगळ्या कारणांवरून फिर्यादीच्या वडिलांकडून त्रास देऊन हुंड्याची रक्कम १ लाख ४५ हजार व एक मोटारसायकल घेतली. त्यानंतरही विवाहित महिलेस सतत हुंड्याची मागणी करून दोन वेळा गर्भपात केला. या सर्वच कारणांमुळे मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याची विवाहित महिलेने जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राठोड हे करीत आहेत.