नेमतवाडी येथील पंडित पाटील यांची पेहे हद्दीत शेती आहे. २०२० मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले होते. शासनाने त्याचे पंचनामे करून पीकनिहाय नुकसान भरपाई दिली. पाटील यांच्या झालेल्या नुकसानीचे शासन स्तरावरून पैसे आले. परंतु तलाठ्यांनी चुकीचा खाते क्रमांक दिल्यामुळे पहिल्या यादीत पाटील यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यानंतर दुसऱ्यावेळी खाते क्रमांकाच्या चुकीची दुरुस्ती केली. पाटील यांचा जिल्हा मध्यवर्ती बँक पटवर्धन कुरोली शाखेचा खाते क्रमांक ८३७८ ऐवजी ८३७६ खाते क्रमांकावर नुकसानभरपाईचे पैसे वर्ग करण्याचा तलाठ्यांनी प्रताप केल्यामुळे दुसऱ्याच खातेदाराच्या खात्यावर पैसे जमा झाले. त्यामुळे १० महिन्यांपासून पाटील यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा करण्याशिवाय पदरी निराशाच आली आहे.
आणखी किती दिवस राहणार वंचित
मागील वर्षीच्या अवकाळी नुकसानभरपाईचे पैसे मिळविण्यासाठी मी सतत पाठपुरावा करीत होतो. परंतु तलाठी फोन घेत नव्हते. त्यामुळे तहसील कार्यालयात संपर्क साधून प्रयत्न केला. तलाठ्यांनी दोनवेळा खाते क्रमांक दुरुस्त केला असला तरीही माझे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर जमा झाले. यामुळे मला अद्यापपर्यंत नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागत आहे. आणखी किती दिवस मला वंचित ठेवले जाणार असल्याचा सवाल वंचित शेतकरी पंडित पाटील यांनी उपस्थित केला.
कोट ::::::::::::::::::
आमचा संप चालू आहे. संप मिटला की दुसऱ्या दिवशी त्यांना पैसे मिळतील याची व्यवस्था करतो.
- सुशील तपसे
तलाठी, पेहे
कोट ::::::::::::::::
आमच्या शाखेत ८३७६ खाते नंबरवर आलेले पैसे संबंधित खातेदारांनी काढले आहेत.
- कैलास गायकवाड
शाखाधिकारी, डीसीसी बँक पटवर्धन कुरोली