सोलापूर: स्थळ जुना तुळजापूर नाका जवळील पूल... पांढºया रंगाच्या कारमधून चौघे इसम आले.. त्यांनी वडिलांनी घेतलेल्या व्याजाचे पैसे न दिल्याने वडिलांना आणि भावास जबरदस्तीने कारमध्ये चढवले आणि पसार झाले. अशा आशयाची तक्रार मनुबाई अनैकसिंग धुरवा (वय- २५, रा. सायगाव, जिल्हा सागर, मध्यप्रदेश) या महिलेने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली. शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना घडल्याचे म्हटले आहे.
यातील फिर्यादी मनुबाईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी, माझे वडील प्रकाश कमरसिंग मरकाम (वय- ५०) व भाऊ साहूनसिंग मरकाम (वय- १६) दोघे मोहोळ येथून एम.पी. १५ एमडी.९०९७ या मोटरसायकलवरुन सोलापूरकडे निघालो होतो. सोलापूरजवळ आल्यानंतर तुळजापूर नाक्याच्या पुलाजवळ गाडी थांबवली. मी शौचालयासाठी काही अंतरावर गेले. यावेळी साधारण दुपारचे ३.३० वाजलेले होते.
यादरम्यान पांढºया रंगाच्या कारमधून गोपाळ (पूर्ण नाव माहिती नाही रा.धुळे) याच्यासह चौघे आमची मोटरसायकल थांबलेल्या ठिकाणी आले. वडिलांनी त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांपैकी दीड लाख रुपये दिले नाहीत म्हणून त्यांनी वडील व भावाला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यांच्यातल्या एकाने आमच्या मोटरसायकलचा ताबा घेतला आणि पुण्याकडे जाणाºया रोडने निघून गेले. या चौघांविरुद्ध सदर महिलेने जबरदस्तीने अपहरण केल्याची तक्रार दिल्याने जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास फौजदार खटके करीत आहेत.