सोलापूर : सोलापूर विभागात कृत्रिम पाऊ स पाडण्यासाठी दोन एअरक्राफ्ट सोलापूरच्या विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यासाठी सोलापूर आणि तुळजापूर या दोन ठिकाणी रडार यंत्रणा उभारण्यात आली असून येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत हा प्रयोग चालणार आहे.सोलापूर जिल्ह्यातील पावसाचे अल्प प्रमाण लक्षात घेता येथे कृत्रिम पाऊस कधी पाडणार अशी विचारणा सातत्याने होत होती. त्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने भारतीय उष्णप्रदेशीय मौैसम विज्ञान संस्थान पुणे या कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेऊन चौथ्या टप्प्यामध्ये सोलापूर विभागात हा प्रयोग सुरू होणार आहे.
नेमकी या प्रयोगाला सुरुवात कधी होणार याबद्दल अद्याप ठरलेले नाही. भारतीय उष्णप्रदेशीय मौैसम विज्ञान संस्थान पुणे येथील प्रकल्प अधिकारी थारा प्रकाश सोमवारी सोलापुरात येऊन जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाºयांशी बैठक घेणार होते; मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ही बैठक आता मंगळवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. या बैठकीनंतरच कृत्रिम पावसाच्या प्रयोगासंदर्भात अंतिम भूमिका घेतली जाणार आहे.
या प्रयोगासाठी सोलापूरच्या विमानतळावर दोन एअरक्रॉप्ट विमाने दाखल झाली आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने तीन महिन्यांसाठी संरक्षण मागविले आहे. केंद्रसरकारच्या शोध मोहिमेंतर्गत भारतीय उष्णप्रदेशीय मौैसम विज्ञान संस्थान पुणे यांनी सोलापुरातील केगावजवळील सिंहगड कॉलेज आणि तुळजापुरातील तुळजाभवानी कॉलेजच्या परिसरात यंत्रणा उभारली आहे. या दोन ठिकाणावरून कृत्रिम पावसासाठी नियंत्रण राखले जाणार आहे. २०० किलोमीटरच्या क्षेत्रापर्यंत त्याचे प्रभावक्षेत्र असणार आहे. यासाठी १२ ते १५ तंत्रज्ञांचा चमू सोलापुरात दाखल झाला आहे.
चौथ्या टप्प्यातील प्रयोगकेंद्र सरकारच्या शोध मोहिमेंतर्गत सोलापुरात होणारा हा कृत्रिम पावसाचा चौथ्या टप्प्यातील प्रयोग आहे. २०१६ ते २०१९ या काळासाठी चौथा टप्पा ठरविण्यात आला आहे. त्यानुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या काळासाठी हा प्रयोग सोलापूर विभागात होणार आहे. त्यासंदर्भात सर्व प्रकारची तांत्रिक माहिती आणि प्रयोगाच्या यशस्वीतेच्या दृष्टीने मंगळवारच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.