सोलापूर - सोशल मीडियावर आलेल्या लिंकवर क्लिक करून त्यात पैसे पाठवल्यानंतर जादा पैसे मिळतील असे आमिष दाखवून एका तरुणाची २ लाख ३२ हजारांची फसवणूक झाली. याप्रकरणी योगेश आदिनाथ सगरे ( वय ३५, रा. स्वामी विवेकानंद नगर, हत्तूरे वस्ती) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एका बँक खाते धारकावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी योगेश सगरे हे घरात असताना त्यांना मोबाईलवर संदेश पाठवत एक हजार रुपये पाठवल्यास १३९० रुपये जमा होतील असे सांगितले. त्यानुसार पैसे पाठवल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे आले. यामुळे सगर यांचा विश्वास बसला. यामुळे सगर यांना अडीच लाख रुपये पाठवल्यास चार लाख रुपये मिळतील असा संदेश पाठविला. यामुळे त्यांनी अडीच लाख रुपये पाठवल्यानंतर ते पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली. अशा आशायाची फिर्याद सगर यांनी दिली. या फिर्यादीवरून अज्ञात बँकेच्या खाते धारकावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अजय जगताप करत आहेत.