गेल्या दीड वर्षापासून देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील ७५ कोटी नागरिकांचे लसीकरण करून कोरोनापासून बचावाची संजीवनी दिली आहे. तरीही सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानांतर्गत प्रत्येक बुथवर दोन स्वास्थ्य स्वयंसेवकांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण दिले आहे.
या अभियानाचा पुढील टप्पा म्हणून १७ व १८ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रत्येक बुथवर २५ नागरिकांचे लसीकरण करण्याचा संकल्प भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील २०० बुथवर १ लाख ७५ लाख नागरिकांचे लसीकरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. लसीकरण होणाऱ्या सांगोला ग्रामीण रुग्णालय, कमलापूर उपकेंद्र या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. परेश खंडागळे, कमलापूरचे माजी उपसरपंच आनंद तंडे, मंगेश आदलिंगे, धनंजय हजारे, बिरा माने, दत्ता कोळेकर आदी उपस्थित होते. याची जबाबदारी जिल्हा डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. भारत पंखे, संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख योगेश कबाडे यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील भाजप तालुकाध्यक्ष व डॉक्टर सेलचे अध्यक्ष यांच्यावर सोपवली आहे.