याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत होते. यावेळी खबऱ्यामार्फत पेनूरच्या हद्दीमध्ये मोहोळ ते पंढरपूर जाणाऱ्या रोडवर बेकायदेशीर चंदनाची खरेदी विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन पाहिले. तेथे रमेश आप्पाराव चवरे (रा पेनूर ता. मोहोळ) हा लंकेश्वर काळे, अमोल काळे (दोघे रा. यल्लमवाडी ता मोहोळ) या दोघांकडून सुगंधी चंदनाची लाकडे खरेदी करत असल्याचे निदर्शनास आले.
पोलीस पथकाने तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील २३ किलो ४०० ग्रॅम सुगंधी चंदनाची अंदाजे किंमत २ लाख ३४ हजार, दुचाकी, वजनकाटा व अन्य साहित्य असा ३ हजार रुपयांचा एकूण २ लाख ८५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वरील चौघांविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा सोलापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक फौजदार मोहम्मद मुजावर, हवालदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, अक्षय दळवी, धनराज गायकवाड, समीर शेख व मोहोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार पितांबर शिंदे, पोलीस गणेश दळवी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
-----
असा चालायची खरेदी-विक्री
पोलिसांनी लंकेश्वर काळे याच्याकडून चंदनाच्या लाकडांविषयी माहिती विचारली असता त्याने आपला साथीदार अमोलसमवेत मिळून (रा. बाभूळगाव, मोहोळ) शिवारातून चंदनाची झाडे तोडून तोडलेली लाकडे रमेश चवरे यास विकण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. तर रमेश चवरे याने विकत घेत असलेली चंदनाची लाकडे पुढे बिनू बळीराम दाढे (रा वाफळे ता मोहोळ) याला विक्री करत असल्याचे सांगितले.