कुसळंब : बार्शी तालुक्यात नारीवाडी शिवारात दरोडा टाकल्याप्रकरणी पांगरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्यातील डिझेल, मोबाइल, पाकीट असा चार लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सतीश अच्युत पवार (वय २५, रा. सोनी जवळा, ता. केज, जि.बीड) व आकाश सुदाम पवार (वय २०, रा. बुकनवाडी, ता. जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अक्षय दशरथ चव्हाण (रा. सावडी, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. पांगरी पोलिसांनी त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात १४ हजार ४०० रुपयांचे १५० लीटर डिझेल व फिर्यादीचे पाकीट, मोबाइल, पैसे काढून घेतले होते. ते जप्त करण्यात आले आहे.
अक्षय चव्हाण यांना चोरट्यांनी लोखंडी पाइपने मारहाण करून त्यांचे हात-पाय बांधले होते. याबाबतची माहिती समजताच पांगरी पोलिसांनी नारी, चिखर्डे व नारीवाडी गावातील नागरिकांना फोन करून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.
---
लोकांच्या मदतीने आरोपी ताब्यात
पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस नाईक पांडुरंग मुंडे, पोलीस नाईक सुनील शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील बोदमवाड, सुळे, गणेश घुले, पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश कोठावळे, मनोज भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गावातील लोकांच्या मदतीने दोन चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पीकअप वाहन (एम.एच. ०४- ९५५४), चार मोबाइल, १५० लीटर डिझेल, चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेला हातपंप व पाइप, असा एकूण ४ लाख ४५ हजार ९०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
----
फोटो : ११ कुसळंब
पांगरी पोलिसांनी दरोडा प्रकरणात पकडलेले दोघे आरोपी आणि साहित्य.