शुक्रवारी रात्री वेळापूर येथील वीज बोर्डाजवळच्या वस्तीवर अवैध दारू विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर काहींनी प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये वेळापूरचे पोलीस निरीक्षक भगवानराव खारतोडे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक मेहकर हे तीन कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दीपक मधुकर नेहरकर यांनी मंगेश शिवाजी शिंदे, शिवाजी वगऱ्या शिंदे, लेखत झंपऱ्या शिंदे, राधाबाई काळे, रवी शिवाजी शिंदे (रा. वेळापूर) या पाच जणांविरुद्ध वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा तक्रार दाखल केली होती.
हल्ल्यातील जखमी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू करीत आहेत.