मंद्रुप : गुटखा घेऊन जाणारी कार लाच घेऊन सोडून दिली़ ही बाब उघडकीस आल्याने मंद्रुप पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले़ पोलीस अधीक्षक मकरंद रानडे यांनी ही कारवाई केली़ वांगी (ता़ द़ सोलापूर) येथे वारंवार घरफोड्या होत असत़ त्यामुळे ग्रामस्थ रात्रीची गस्त घालतात़ ११ जून रोजी रात्री १२ वाजता वांगी-वडकबाळ रस्त्यावर कारशेजारी समाधान सुर्डे हा अंधारात दबा धरून उभा होता़ ग्रामस्थांनी त्याला हटकले़ तेव्हा त्याने पोलीस असल्याचे सांगितले़ त्याच्या वावरण्याचा संशय आल्याने ग्रामस्थांनी मंद्रुप पोलीस ठाण्याशी संपर्क साधला़ पो़ कॉ़ केदारनाथ भरमशेट्टी यांनी तो आमचा माणूस आहे त्याला सोडून द्या़, अशी सूचना केली़ ग्रामस्थांनी थेट सपोनि प्रकाश रासकर यांना ही बाब सांगितली़ दरम्यान, भरमशेट्टी हे पोकॉ दत्ता जाधव यांच्यासह वडकबाळला आले़ त्यांनी सुर्डे याच्याशी हितगुज केली़ आर्थिक देवाण-घेवाण केली आणि कर्नाटकातून आलेला टेम्पो व कार सुरक्षित स्थळी पाठविण्याची व्यवस्था केली़ या टेम्पोमध्ये कर्नाटकातून चोरीचा गुटखा आणल्याची माहिती मिळाल्याने ग्रामस्थ चिडले़ वांगी ग्रामस्थांनी प्रकाश रासकर यांच्याकडे झाल्या प्रकाराची दखल घेण्याचा आग्रह धरला़ रासकर सखोल चौकशी केल्यानंतर त्यात तथ्य आढळले़ तसा अहवाल त्यांनी जिल्हा अधीक्षक मकरंद रानडे यांच्याकडे पाठविला़ रासकर यांच्या अहवालानुसार दोघांना निलंबित केले़