सोलापूर : जुना पुणे नाक्याकडून बाळ्याच्या दिशेने वेगात निघालेल्या कारने दोन मोटारसायकलींना धडक देऊन डिव्हायडरवर आदळली अन् त्यामधून हातभट्टी दारूचे ट्यूब रस्त्यावर पडले. मोटारसायकलस्वार जखमी झाले. मात्र, कारचालक घटनास्थळावरून पळून गेला. हा प्रकार बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मडकी वस्ती येथे घडला.
चारचाकी कार (क्र. एम. एच. १२/सी.के.०४३४) जुना पुणे नाक्याकडून बाळ्याच्या दिशेने वेगात येत होती. कार मडकी वस्तीजवळील एका शोरूमजवळ आली असता, समोरून जाणाऱ्या दोन मोटारसायकलींना जोरात धडक दिली. धडकेमध्ये एक मोटारसायकल रस्त्याच्या कडेला पडली. त्यावरील चालक जखमी झाला. त्याच वेळेस दुसऱ्या एका मोटारसायकलीला जोरात धडक दिली. धडकेत मोटारसायकल कारच्या खाली सापडली. फरपटत कार डीव्हायडरवर जाऊन आदळली अन् त्यातून हातभट्टी दारूचे ट्यूब रस्त्यावर पडले. अपघात घडताच कारचालक घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिक लोकांनी तत्काळ जखमी दुचाकीस्वारांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघाताची माहिती समजताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
हातभट्टी दारू कोणाची अन् कोठे जात होती?
0 कारमधून घेऊन जाणारी हातभट्टी दारू कुठून आली होती आणि ती नेमकी कुठे जात होती. याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. सध्या हातभट्टी दारूविरोधी मोहीम सुरू आहे. मात्र, सायकल किंवा रिक्षामधून वाहतूक होणारी हातभट्टी दारू कारमधून घेऊन जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात होते. हातभट्टी दारू कोणाची आहे याचाही शोध पोलीस घेत आहेत.
मडकी वस्ती येथे कारने दोन मोटारसायकलींना धडक दिली आहे. कारमध्ये हातभट्टी दारूचे ट्यूब आढळून आले आहेत. याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असून, संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल.
- राजेंद्र बहिरट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फौजदार चावडी पोलीस स्टेशन