सोलापूर : सोलापुरातून कर्नाटकात गेलेल्या दोन एसटी गाड्यांना कन्नड भाषिकांनी काळा रंग लावला आहे. ही घटना अफजलपूर बस डेपोत घडला. त्यामुळे प्रवाशांना त्याच ठिकाणी सोडून वाहन चालक अक्कलकोट बस डेपोकडे परतले. सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळला असून दोन्ही राज्याच्या सीमावर्ती भागात तणाव निर्माण झाला आहे. याची सर्वाधिक धास्ती एसटी महामंडळाने घेतली आहे.
एसटी गाड्यांवर दगडफेक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून यामुळे सोलापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या सत्तर गाड्या तसेच कर्नाटक मधून सोलापुरात येणाऱ्या सत्तर गाड्या असे एकूण एकशे चाळीस गाड्यांचा रोजचा प्रवास रोखण्यात आला आहे, अशी माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे दोन्ही राज्यातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. खासगी गाड्यांचा वापर प्रवासी करत आहेत.
अक्कलकोट बस डेपोतून अफजलपूर बस स्थानकावर गेलेल्या गाड्यांना समोरच्या भागावर काळा ग्रीस लावण्यात आला आहे. बस स्थानकावर वाहन चालक चहासाठी खाली उतरले. चहा घेवून परतल्यानंतर वाहन चालकांना या घटनेची माहिती मिळाली. ही माहिती त्यांनी अक्कलकोट बस डेपोच्या वरिष्ठांना दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ सर्व गाड्यांचा प्रवास रोखला. कर्नाटक पोलिसांनी देखील सोलापुरातून गाड्या पाठवू नका, अशी विनंती केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र व कर्नाटक सीमावर्ती भागात तणाव असून प्रतिबंधक उपाययोजना म्हणून आगार प्रमुखांनी कर्नाटककडे गाड्या पाठवू नयेत, अशी सूचना आगार प्रमुखांना करण्यात आली आहे.