काशिनाथ वाघमारे, सोलापूर : प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकाऱ्यासह पोलिस पथकाने छापा टाकून मुंबई इंडियन विरुद्ध लखनौ सुपर जायन्ट्स यांच्यातील चालू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाइन सट्टा खेळताना दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून रोख ८८ हजार रुपयांसह, महागडे मोबाइल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, टॅबलेट असा ३ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई शुक्रवारी रात्री सुमारास सांगोला येथील वासूद चौकातील केली.याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन माळी यांनी फिर्यादी दिली असून पोलिसांनी वैभव तुळशीराम जाधव व यश सिद्धेश्वर जाधव (रा. पुजारवाडी, सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांना सांगोला शहरातील वासूद चौक येथील एका प्लाझामध्ये दोघे बंद खोलीत आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाइन सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे शुभम कुमार, पोलिस हेडकॉन्स्टेबल गजानन माळी, मोरे, नलवडे, उबाळे, चालक पोलिस नाईक आष्टगी, पोलिस कॉन्स्टेबल राठोड यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील मॅनेजर काउंटरच्या पाठीमागील दोन रूमवर छापा टाकला.
यावेळी दोघेजण मोबाइल फोन, लॅपटॉप व टॅबलेटद्वारे क्रिकेट मॅचवर ऑनलाइन जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून रोख ८८ हजार, २५ हजारांचा लॅपटॉप, १० हजारांचा टॅब, १ लाख रुपयांचे दोन मोबाइल, २५ हजारांचा मोबाइल, १ हजाराचे ५ मोबाइल, २५ हजारांचा एलईडी टीव्ही, जुगार साहित्य, असा ३ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.