सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी शिवारात असलेल्या शेतातील शेततळ्यामध्ये जन्मदात्या पित्यासमोरच पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. मुले बुडत असताना पित्यासह एकालाही पोहायला येत नव्हते. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि.२१) सायंकाळी ४.३० ते ५.३० दरम्यान घडली.
अर्जुन हरी पौळ (वय १५), आर्यन हरी पौळ (वय ७ दोघे रा. कर्देहळ्ळी तालुका दक्षिण सोलापूर) असे मृत पावलेल्या दोन मुलांची नावे आहेत. हरि नारायण पौळ (वय ४५) हे कर्देहळ्ळी रस्त्यावरील कुंभारी शिवारात असलेल्या अमित ढोले यांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून कामाला आहेत. सोमवारी दुपारी त्यांनी शेतामध्ये स्वतःची म्हैस चरण्यासाठी आणली होती. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मोठा मुलगा अर्जुन व लहान मुलगा आर्यन हे दोघे शेतामध्ये आले. मोठा मुलगा अर्जुन याला पोहायला येत होते. त्यामुळे तो शेततळ्याकडे गेला. अंगावरील कपडे काढून तो शेततळ्यातील पाण्यात उतरला. पोहत असताना कडेला उभारलेल्या आर्यनचा अचानक पाय घसरला आणि तो पाण्यात पडला.
आर्यनने मोठा भाऊ अर्जुन याला मिठी मारली. त्यामुळे दोघेही पाण्यात बुडू लागले. बुडताना दोघांनी आरडाओरड सुरू केली, आवाज ऐकून मुलांचा पिता हरी पौळ हे शेततळ्याच्या दिशेने पळत आले. जवळ येऊन पाहिले असता त्यांची दोन्ही मुले पाण्यात बुडत होती. त्यांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी आवाज दिला. चार ते पाच लोक आवाज ऐकून शेततळ्याच्या ठिकाणी धावत आले; मात्र त्यातील एकाही व्यक्तीला पोहता येत नव्हतं. शेवटी पित्यासमोर दोन्ही मुले पाण्यात बुडाली. काही वेळानंतर पोहायला येणारे दोन लोक धावत आले त्यांनी पाण्यात उडी मारून दोघांना वर काढले. कुंभारी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता दोघांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक स्वामिराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले वळसंग पोलीस कर्मचारी दाखल झाले. याची नोंद वळसंग पोलीस ठाण्यांमध्ये झाली आहे.
शोककळा पसरली
- 0 मुलांचे आई-वडील हे गरीब कुटुंबातील असून, ते गेल्या १५ ते १६ वर्षांपासून सालगडी म्हणून काम करतात.
- 0 अर्जुन हा कर्देहळ्ळी येथील नृसिंह विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकत होता, तर आर्यन हा कुंभारी येथील बी. एन. बिराजदार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होता.
- 0 हरी पौळ यांना एकूण तीन मुले असून, तिसरा मुलगा तीन वर्षांचा आहे.
- 0 दोन्ही मुलांच्या मृत्युमुळे कर्देहळ्ळी व कुंभारी परिसरावर शोककळा पसरली आहे.