राजकुमार सारोळे
सोलापूर : सोलापूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि भारत भालके हे दोघेही आवर्जून उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांची गाडी विमानतळावरून बाहेर पडताना हे दोन्ही आमदार हात जोडून उभारल्याचे दृश्य शेकडो उपस्थितांनी पाहिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी दुपारी सोलापूर जिल्ह्याच्या दौºयावर आले. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख त्यांच्या सहकाºयांसह जमले होते. त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख हेही जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह विमानतळावर दाखल झाले. त्यांच्यापाठोपाठ आमदार भारत भालके आले.
विमानतळातील विश्रांती कक्षासमोर उभयतांची भेट झाली. याचदरम्यान गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आले. त्यांच्यासमवेत बोलत आमदार भालके स्वागत कक्षात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस तुमच्याकडे येणार आहेत का असा सवाल विचारल्यावर भालके म्हणाले मला माहीत नाही. समोर थांबलेल्या पालकमंत्र्यांना उद्देशून त्यांनी विचारले, मुख्यमंत्र्यांचा दौरा माझ्याकडे आहे का. त्यावर पालकमंत्री देशमुख म्हणाले नाना असे दुरुन का या जवळ या. भालके यांनी जवळ जाऊन हातात हात दिल्यावर पालकमंत्री म्हणाले, नाना हात काय मिळविताय, लवकर या तुमचे स्वागत आहे असे म्हणत गळाभेट दिली. हे पाहून उपस्थित असलेले सर्वजण चकीत झाले. त्यानंतर दोघांत पाऊस पाण्याच्या गप्पा रंगल्या.
तितक्यात अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे तेथे आले. त्यावर भालके म्हणाले, खरी यांची चर्चा आहे बघा, आता यांच्या भेटीचे पहा असे म्हणताच आमदार म्हेत्रे यांनी दुरुनच हात जोडत स्मितहास्य केले. त्यानंतर आमदार भालके, आमदार म्हेत्रे हे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबरोबर गप्पात रंगले. या दोघांपासून सहकारमंत्री सुभाष देशमुख हे मात्र दूरच थांबले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होताच महापौर शोभा बनशेट्टी, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील हेही स्वागताला आले. त्यांना पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी कसे आहात असे विचारत स्मितहास्य केले. उत्तम असे म्हणत रणजितसिंह यांनी चरणस्पर्श केले. याचवेळी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाºयांनी त्यांचे स्वागत केले.
प्रहार संघटनेच्या पदाधिकाºयांनी महापालिका परिवहनचा पगार यापुढे नियमित करावा या मागणीसाठी गर्दी केली. यामुळे आमदार भारत भालके, आमदार सिद्धाराम म्हेत्रे वेटिंगमध्येच राहिले. या गर्दीत दोघांनी दिलेला पुष्पगुच्छ स्वीकारून मुख्यमंत्री फडणवीस पुढे निघून गेले.
भालके, म्हेत्रे झाले नाराज- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी आमदार भारत भालके, आमदार सिद्धाराम म्हेत्रे विमानतळावर आले होते. मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह समर्थकांनी त्यांच्या स्वागताला गर्दी केली. त्यामुळे हे दोघे वेटिंगमध्ये राहिले. कार्यकर्त्यांच्या गर्दीतच या दोघांचे स्वागत मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले व काहीएक न बोलता ते पुढे निघून गेले. त्यामुळे नाराज होऊन दोघेही विमानतळाच्या बाहेर आले. मुख्यमंत्र्यांचा ताफा गेल्यावर एकमेकांशी गप्पा मारून भालके व म्हेत्रे मार्गस्थ झाले.