बार्शी: बार्शी शहरात कोरोनाचे पहिले चार पॉझिटिव्ह रुग्ण असताना आज शुक्रवार १९ जून रोजी सकाळी नऊ वाजता प्राप्त झालेल्या सतरा अहवालात बार्शी शहरातील उपळाई रोड येथील दोन अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे शहरातील रुग्णांचा आकडा आता सहा झाला आहे.
आज आलेले दोन अहवाल हे उपळाई रोड येथील यापूर्वी पॉझिटिव्ह निघालेल्या डॉक्टराच्या संपर्कातून पॉझिटिव्ह झाले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी संतोष जोगदंड यांनी दिली.
गुरुवारी रात्री बार्शी शहर व ग्रामीण भागातील एकूण ४० अहवाल प्रलंबित होते. त्यातील बार्शी शहरातील २६, वैराग येथील १० पांगरी येथील २, खांडवी येथील १, कुसळब येथील १ असे अहवालांचा समावेश होता. आज सकाळी आलेल्या सतरा अहवालात खांडवीमधील एकमेव अहवाल निगेटिव्ह आला तर पांगरीतील दोन अहवालापैकी एक निगेटिव्ह आला तर एक अहवाल येणे बाकी आहे.
आणखीन २३ प्रलंबित असून त्यांचे रिपोर्ट संध्याकाळपर्यंत येणे अपेक्षित आहे. प्रलंबित अहवालात बार्शी शहरातील ११, वैराग १० ,पांगरी आणि कुसळंब येथील एका अहवालाचा समावेश आहे.
बार्शी शहरांमध्ये सोलापूर रोड येथील बगले बरड येथे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. तर वाणी प्लॉट येथील पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी गेला आहे. तर आता उपळाई रोडला तीन पॉझिटिव्ह झाले असून त्यातील एक पॉझिटिव्ह रुग्ण पुणे येथील खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहे.
बार्शी शहरांमध्ये रोज वाढणारी गर्दी आणि नागरिकांचा बेजबाबदारपणा यामुळे सुद्धा शहरात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी शारीरिक अंतर राखून तोंडाला मास्क वापरणे आणि शक्यतो स्वतःचे शरीर आणि घर निर्जंतुक करण्याकडे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही डॉ. संतोष जोगदंड यांनी सांगितले.