मूळचा बिहारचा अभिषेक अशोक कुमार (वय २९, मालवणी, मालाड) याची पत्नी आषाढ पाहण्यासाठी माहेरी हणमगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे आली होती. तिला भेटण्यासाठी अभिषेक हा त्याचा साथीदार विनोद अशोक पवार (वय ४४, मालवणी, मालाड) याला घेऊन हनमगावला आला होता. नवघर पोलीस ठाण्याला ही माहिती आणि संशयिताचे फोटो मिळाले. त्यांनी वळसंग पोलीस ठाण्याला कळवताच एक फौजदार आणि दोन पोलिसांनी हणमगाव येथून शिताफीने दोघांना ताब्यात घेतले.
नवघर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन बेंद्रे यांच्याकडे दोन्ही सराईतांना सोपविण्यात आले. या दोघांवर कारची काच फोडून कारटेप, लॅपटॉप, महागड्या वस्तू चोरल्याचे वसई-विरार, मीरा-भाईंदर, पुणे आदी ठिकाणी २२ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय २८ ते ३० अन्य गुन्ह्यात दोघे पोलिसांना हवे होते. वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले आणि नवघरचे सपोनि नितीन बेंद्रे यांच्यात दोन दिवस योग्य समन्वय साधण्यात आला होता.
----