इंदोरी (ता. मावळ) येथे राहणारे भराटे कुटुंब मूळचे सावडी (ता. करमाळा) येथील आहे. भरत भराटे हे पंधरा वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात पुण्यात गेले होते. तेथे काही दिवस ड्रायव्हर म्हणून दुसऱ्यांच्या गाडीवर काम करून स्वतःचा ट्रक घेतला होता. लॉकडाऊन लागण्यापूर्वी ते सावडी येथे येऊन गेले होते. त्यानंतर रविवारी रात्री भराटे कुटुंबातील मृत बाप व दोन मुलींवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ सावडीकरांवर आली.
भरत भराटे यांनी मुलींच्या मोबाइलवर बोलण्याचा राग मनात धरून हे कृत्य केले. नंदिनी भराटे (१९) व वैष्णवी भरत भराटे (१४), असे खून झालेल्या दोन्ही बहिणींची नावे आहेत, तर भरत भराटे (वय ४५), असे पित्याचे नाव आहे. भराटे यांच्या पश्चात आठ वर्षांची मुलगी व पत्नी आहे. गेल्या काही वर्षांपासून हे कुटुंब मावळ तालुक्यातील इंदोरी येथे वास्तव्यास होते. भरत भराटे यांचा स्वत:चा ट्रक होता. तीन मुली व पत्नी असा त्यांचा परिवार होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुलींचे प्रेम प्रकरण असल्याचा संशय भरत भराटे यांना होता. मुलींच्या वागण्याने आपले नाव खराब होईल, यापेक्षा जीव दिलेला बरा, असे भरत भराटेने पत्नी सपना यांना वारंवार बोलून दाखवले होते. पण ते असे करतील असे कधी वाटले नव्हते.
यातूनच भराटे रविवारी पहाटे एकच्या सुमारास उठले व आपला स्वतःचा ट्रक (एम. एच. १२ एचडी १६०४) चालू करून नंदिनी आणि वैष्णवी या मुलींच्या अंगावर घातला व मुलींच्या अंगावरून ट्रक जाताच ट्रकमधून खाली उतरून स्वतः त्याच ट्रकखाली उडी मारून जीव दिला होता. रविवारी रात्री उशिरा भराटे कुटुंबातील तीनही मृतदेह सावडीत आणण्यात आले. त्यांच्यावर उशिरा अंत्यसंकार झाले.
----
गाव झालं अंतर्मुख
भरत भराटे हे धार्मिक वृत्तीचे होते. दरवर्षी भराटे वस्तीवर हनुमान जयंतीनिमित्त होणाऱ्या सप्ताहात वर्गणी देण्यापासून सर्व कामात आघाडीवर असायचे. हलाखीच्या परिस्थितीत पुण्यात जाऊन त्यांनी संसार वाढवला होता. त्यांनी हा निर्णय घ्यायला नको होता. या घटनेने गाव अंतर्मुख झाले आहे, अशा भावना सावडीच्या सतीश शेळके, हनुमंत मांढरे यांनी व्यक्त केल्या.
----फोटो ---मयत भरत भराटे यांनी काही वर्षापूर्वी आपल्या दोन मुली नंदीनी व वैष्णवीसह काढलेला सेल्फी.