सोलापूर : विधानसभेच्या जिल्ह्यातील अकरा जागांसाठी १५४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सोलापूर शहर मध्य, सांगोला व पंढरपुरात प्रत्येकी २० उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान नोंदविण्यासाठी दोन ईव्हीएम मशीन्स लागणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी २३७ उमेदवारांनी अर्ज भरले होते. सोमवारी अर्ज माघारी घेण्यादिवशी ८३ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात १५४ उमेदवार उरले आहेत. मतदारसंघनिहाय उमेदवारांंची संख्या पुढीलप्रमाणे आहे. करमाळा: ८ (माघार: १०), माढा: १० (६), बार्शी: १४ (६), मोहोळ: १४ (८), सोलापूर शहर उत्तर: १५ (१), सोलापूर शहर मध्य: २० (७), अक्कलकोट: ११ (६), दक्षिण सोलापूर: १४ (१२), पंढरपूर: २० (८), सांगोला: २० (११), माळशिरस: ८ (८). एका ईव्हीएम मशीनवर १५ उमेदवार व एक नोटा असे १६ मतदान नोंदविण्याची सोय आहे. तीन मतदारसंघात २० उमेदवार असल्याने आता या ठिकाणी दोन मशीन्स लावाव्या लागणार आहेत.
मतदारसंघनिहाय दोन मशीन्स लागणाºया विधानसभा मतदारसंघांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. शहर मध्य: मतदान केंद्र: २९३, लागणाºया ईव्हीएम: ७०४, सांगोला: मतदान केंद्र: २९१, ईव्हीएम: ६९९, पंढरपूर: ३२८, ईव्हीएम: ७८७. निवडणूक आयोगाने जादा मशीन्सचा अगोदरच पुरवठा केलेला आहे. उपलब्ध मशीन्स: ईव्हीएम: ६५०५, कंट्रोल युनिट: ४५८९, व्हीव्हीपॅट: ४६९५. एकूण लोकसंख्येच्या ७२.७२ टक्के इतके मतदार आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात मनुष्य लिंग प्रमाण ९१८ असायला हवे होते. लोकसभेसाठी हे प्रमाण ९१० होते तर आता विधानसभेसाठी ९११ इतके झाले आहे. मतदार जागृती कार्यक्रमामुळे ही वाढ झाल्याचा दावा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भोसले यांनी केला.
१३ हजारांनी मतदार वाढले- जिल्ह्याची लोकसंख्या ४७ लाख २३ हजार इतकी आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ३४ लाख २१ हजार ३२४ इतके मतदार होते. विधानसभेसाठी ३१ आॅगस्टपर्यंत मतदार यादी अंतिम करण्यात आल्यावर नोकरदार मतदारांसह एकूण मतदारांची संख्या ३४ लाख २५ हजार ८४३ इतकी होती. त्यानंतर फॉर्म ६ भरून ४ आॅक्टोबरपर्यंत नवीन मतदार नोंदणी घेण्यात आली. त्यात १३ हजार २२५ नवीन मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी ३४ लाख ३४ हजार ५४९ मतदारांची झाली आहे.