सोलापूर : मालट्रकच्या बॅटऱ्या चोरून भंगारात विकणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या कामगिरीत सात गुन्हे उघडकीस आले असून पावणे दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेत भंगारवाल्यावरही गुन्हा दाखल करून अधिकची चौकशी पोलिस करीत आहेत.
विकी दशरथ गायकवाड, (वय २४, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी, श्रीकृष्ण मंदिराजवळ, सोलापूर) व संदीप मौला गायकवाड (वय ३३) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, शहरातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणत असताना ट्रक वाहनाच्या बॅटऱ्या चोरी करणारे दोघे जण हे चोरीच्या बॅटऱ्या घेऊन विक्रीसाठी सलगरवस्ती परिसरातून शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सलगर वस्ती परिसरात सापळा लावला. दोघेजण चोरीच्या बॅटऱ्या घेऊन जात असताना दिसले. त्यांना पकडून अधिक चौकशी केली असता त्या दोघांनी चोरी केल्याची कबुली दिली. यावेळी त्यांच्याकडून ५ मोटारसायकली, १ बॅटरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.