करमाळा : करमाळा-अहमदनगर रस्त्यावर मांगीजवळ वाहनाच्या अपघातात मोटारसायकलवरील दोघे जण जागीच ठार झाले.
लक्ष्मण लोखंडे (रा. आरोळेवस्ती, जामखेड) व महेश शिंदे (रा. अकलूज) असे मरण पावलेल्या दोघांची नावे असून रविवारी सकाळी हा अपघात घडला.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार बीड जिल्ह्यात आष्टी येथे कामानिमित्ताने हे दोघे एकत्रित राहत होते. लॉकडाऊन काळात काम बंद असल्याने हे दोघे मोटारसायकलवरून नातेवाइकांना भेटण्यासाठी निघाले होते. त्यांची मोटारसायकल मांगी पुलाजवळ आली असता एका वाहनाने धडक दिली. त्यात हे दोघे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, उपनिरीक्षक तानाजी पवार व सहायक फौजदार वने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.