कर्नाटकातील चडचण येथून तीन तरुण आज सकाळी क्रिकेट मॅच खेळण्यासाठी आले होते. मॅच संपल्यानंतर गावाकडे परतत असताना मंद्रूपपासून काही अंतरावर माळकवठे गावाजवळ समोरून येणाऱ्या टिप्परने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकी चालक संतोष नागप्पा शिंदे (वय २२ रा. शिवाजीनगर, चडचण) याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच ठार झाला. त्याच्या पाठीमागे बसलेले कार्तिक राजकुमार भंडारी (वय १८, रा.चडचण) आणि आकाश तुकाराम शिंदे (वय १७ रा. चडचण) हे दोघे रस्त्याच्या कडेला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले.
जखमींना शशिकांत सासवे (रा. कुरघोट) यांनी उपचारासाठी सोलापुरात खाजगी रुग्णालयात दाखल केले. कार्तिक भंडारी हा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले, तर आकाश शिंदे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मयत संतोष याचा पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता तर अन्य दोघे अविवाहित आहेत. शशिकांत साळवे यांनी या घटनेची फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे, पोसई गणेश पिंगूवाले तपास करीत आहेत.
----
चडचण टू सोलापूर ठेवला होता स्टेटस
दुचाकीवरून ट्रिपल सीट निघालेल्या या तीनही तरुणांनी सकाळी आपल्या मोबाइलवर चढचण तू सोलापूर असा स्टेटस ठेवला होता गावाबाहेर पडताना त्यांनी दोन बोटे उंचावत आनंद व्यक्त केला होता. त्यांच्या मोबाइलवरून दिसून आले.
----