सोलापूर -: बुधवारी रात्री मार्कंडेय रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला असून त्यापैकी एक रुग्ण नैसर्गिकरित्या मरण पावला तर दुसरा उपचारासाठी दाखल असलेल्या नातेवाईकांना भेटायला आलेला होता असे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने चेअरमन डॉ. माणिक गुर्रंम यांनी सांगितले.
नैसर्गिकरित्या मृत पावलेले सुनील लुंगारे (वय ७४) हे करमाळा येथील रहिवासी असून ते कोविड बाधित असल्याने उपचार घेत होते. बुधवारी सायंकाळपासून त्यांची तब्यात खालावली होती, नेमके स्फोट झाला त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाला असे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. हणमंतू क्षिरसागर (वय ३९) हे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या आईला भेटण्यासाठी आले होते, ज्या ठिकाणी सिलिंडरचा स्फोट झाला त्या परिसरात ते बसले असताना, धुळीत गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हणमंतू यांचा मृत्यू झाला असून जो पर्यंत त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. हणमंतू यांचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. सुनील लुंगारे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.