सांगोला : भरधाव वेगाने जाणार्या रिकाम्या वाळूच्या टिपरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील अल्पवयीन दोघे सख्खे भाऊ गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले तर माता-पिता गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास मिरज रोडवरील हातीद (ता. सांगोला) येथील बसथांब्याजवळ घडली. विराज संदीपान कोळेकर (वय ३), कुणाल संदीपान कोळेकर (वय २) अशी अपघातात ठार झालेल्या अल्पवयीन सख्ख्या भावांची नावे असून संदीपान बाळासाो कोळेकर (वय ३०), मनीषा संदीपान कोळेकर (वय २५, रा. जाकापूर ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) अशी जखमी माता-पित्यांची नावे आहेत. संदीपान बाळासाो कोळेकर हा पत्नी मनीषा, मुलगा विराज व कुणाल यांना (क्र. एम. एच. १० ए. झेड. ६४६२) मोटरसायकलवरुन हातीदकडून मिरज रोडवरुन जाकापूरकडे (ता. कवठेमहांकाळ)े निघाले होते. दरम्यान मिरजकडून (क्र. एम. एच. 0९/ सी. यू. २७००) हा रिकामा वाळूचा टिपर भरधाव वेगाने सांगोल्याच्या दिशेने येत असताना हातीद जवळील बसथांब्याजवळील पुलावर समोरुन जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातात विराज व कुणाल कोळेकर गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले तर संदीपान व मनीषा कोळेकर पती-पत्नी गंभीर जखमी झाले. घटनेची पोलिसांना माहिती कळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.