सोलापूर :
धावत्या रेल्वेत तिकिट तपासणी करीत असताना अचानक पायाला काहीतरी लागले म्हणून पाहिले असता ३२ ग्रॅम सोन्याचे दागिने आढळून आले. प्रामाणिकपणे तिकिट तपासणी अधिकारी एम.बी. शेख यांनी सापडलेले दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले.
याबाबत रेल्वे प्रशासनाने दिलेली माहिती अशी की, १८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी जळगाव- भुसावळ दरम्यान कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस धावत होती. या गाडीत तिकिट तपासणी करण्याची जबाबदारी शेख यांच्याकडे होती. नेहमीप्रमाणे शेख हे प्रत्येक डब्यात जाऊन प्रवाशांकडील तिकिट तपासणी करीत होते. एक्सप्रेसमधील कोच बी १ बर्थ नंबर ४७,५५ जवळ पायाला काहीतरी लागले म्हणून पाहिले असता पायाला सोन्याचे दागिने लागले होते. त्यानंतर नीट पाहिले असता सोन्याची चैन आढळून आली. यावेळी रेल्वे डब्यात इतर प्रवाशांना विचारणा केली असता कोणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शेख यांनी सापडलेली चैन प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन केले.
शेख यांचे प्रामाणिकपणाचे कौतुकमध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात कार्यरत असणारे मुख्य तिकिट निरीक्षक एम. बी. शेख हे१९९५ रोजी रेल्वेत रूजू झाले. त्यांच्या ह्या कामाची प्रसंशा वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक एल. के. रणयेवले यांनी केली आहे.