बार्शी : दिराचा विवाहसोहळा आटोपून पुण्याला परत निघालेल्या महिलेच्या पर्समधून दोन लाखांचे दागिने चोरट्यांनी पळविल्याचा प्रकार बार्शी बसस्थानकावर घडला.
याबाबत विद्या अविनाश देवणे (वय ५२, रा. ससाणे नगर, हडपसर, पुणे) यांनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्या पुण्याला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून दागिन्यांचे पाकीट पळविले.
दिराच्या लग्नसोहळ्यासाठी पतीसोबत त्या बार्शीत आल्या होत्या. हा विवाह सोहळा संपवून दुसऱ्या दिवशी त्या पुण्याला जाण्यासाठी बसस्थानकावर आल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी गळ्यातील दागिने काढून एका पाकिटात ठेवले. हे पाकीट एका पर्समध्ये ठेवले होते. पुण्याला जाणारी बस स्थानकावर येताच प्रवाशांची गर्दी झाली. खांद्यावर पर्स अडकवून गर्दीतून बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी पर्सची चैन उघडून त्यातील पाकीट पळविले. सीटवर बसताच पर्समधून दागिने गेल्याचे लक्षात आले. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल संजय खैरे करत आहेत.