सोलापूर : मायक्रो फायनान्स बेंगलोर येथुन दोन लाखाचे वैयक्तीक कर्ज मंजूर करून देतो म्हणुन, वेळोवेळी मोबाईलवर व्यवहार करून सोलापुरातील दांम्पत्यास १ लाख २ हजार ८00 रूपयाला फसवण्यात आले आहे. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात एका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजयकुमार (रा. बेंगलोर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. फिर्यादी विजय नारायण दोरनाल (वय-४२ रा. १0२/डी/१0५ घोंगडे वस्ती, भवानी पेठ) यांच्या मोबाईलवर १0 जुन २0१८ रोजी एका व्यक्तीचा फोन आला. फोन विजय दोरनाल यांच्या पत्नी सविता दोरनाल यांनी घेतला, तेव्हां विजयकुमार नावाच्या व्यक्तीने हिंदी भाषेतुन तुम्हाला मायक्रो फायनान्स मधुन दोन लाखाचे वैयक्तीक कर्ज २ टक्याने मंजूर करून देतो असे सांगितले. त्यावर सविता दोरनाल यांनी होकार दिला.
११ जुन २0१८ रोजी पुन्हा विजयकुमार याने फोन केला व विजय दोरनाल यांना तुमच्या पत्नीने कर्ज मंजूर करण्याबाबत सांगितले होते असे म्हणाला. विजयकुमार (बेंगलोर) याने त्यांचा विश्वास संपादन करून एक अकौंटनंबर पाठविला व त्यावर लोन मंजूरीसाठी ३ हजार २00 रूपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर वेळोवेळी इन्शुरन्ससाठी १६ हजार रूपये, सोलापुरच्या भेटीसाठी १८ हजार रूपये, कर्ज मंजूर करण्यासाठी १0 हजार रूपये, पुन्हा कर्ज मंजुरीसाठी १८ हजार रूपये, जीएसटी पोटी ५ हजार रूपये, आऊट आॅफ सिटी चार्जेस म्हणुन ५ हजार रूपये अशा वेगवेगळ्या कारणास्तव १ लाख २ हजार ८00 रूपये वेगवेगळ्या बँक अकौंट नंबरवर भरून घेतले. पैसे भरूनही कर्ज मिळत नसल्याने विजय दोरनाल यांनी आमचे पैसे आम्हाला परत द्या अशी मागणी केली असता फोन उचलण्याचे बंद झाले आहे अशी फिर्याद विजय दोरनाल यांनी दिली आहे. हा सर्व प्रकार १0 जुन २0१८ ते १0 सप्टेंबर २0१८ दरम्यान घडला. तपास सपोनि भुसनूर करीत आहेत़