सोलापूर : घरातून पैसे घेतलेली उस्मानाबाद येथील दोन मुलं शिवशाही बसने पुण्याकडे निघाली... येथील महिला वाहतूक नियंत्रक वंदना मते यांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही. त्या नियंत्रकांनी दोन्ही मुलांना रोखलं अन् चाईल्ड लाईन, कल्याण समितीच्या मदतीने त्या दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करीत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.
उस्मानाबाद येथील दोन अल्पवयीन मुले पुणे फिरण्यासाठी घरी कोणालाही न सांगता सोमवारी निघून आली, ती सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोलापूर एसटी स्थानकात येऊन त्यांनी मंगळवारी सकाळी पुण्याला जाणाºया शिवशाही गाडीचे तिकीट काढले. पण, अर्ध्या तासाच्या आतच ती परत आली आणि उद्याचे तिकीट रद्द करा, आजच शिवशाही गाडीने जात असल्याचे सांगितले.
काउंटरवरील वाहतूक नियंत्रक मते यांनी त्या मुलांना कारण विचारले असता ‘आमची आत्या आम्हाला घरात घेत नाही’ म्हणून आम्ही आजच पुण्याला जात असल्याचे सांगितले. तेव्हा मते हे त्या मुलांना तुम्ही तिकीट रद्द करू नका. यातून तुमची मोठी रक्कम कपात होते, तुम्ही उद्याच जावा असे समजावून सांगत असताना तेथे आलेल्या बालकल्याण समितीच्या अनुजा कुलकर्णी यांनी त्या मुलांची विचारपूस करत मुलांच्या पालकांना संपर्क साधला. त्यानंतर पालक आल्यावर दोघांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. याकामी अनुजा कुलकर्णी, चाईल्ड लाईन १०१८ चे समन्वयक आनंद उपे, स्वप्निल शेट्टी, सुवर्णा बुंदाले, विलास शिदे, शहानूर सय्यद यांची मोलाची मदत झाली.
मुलांकडे होते जळपास तीस हजार रुपयेपळून आलेल्या मुलांनी घरातून जवळपास ३१ हजार रुपये आणले होते. हे दोघे उस्मानाबाद येथून जीपने प्रवास करत सोलापूर गाठले, तेव्हा जीपचालकाने त्या मुलांकडून साडेतीनशे रुपये उकळले होते. ती मुलं सोलापुरात आल्यानंतर त्यांच्याकडे रोख २९ हजार ९०० रुपये सापडले.