बारलोणी पोलीस हल्ला प्रकरणात यापूर्वी राहुल सर्जेराव गुंजाळ (वय २२), यशवंत दशरथ गुंजाळ (३०), अनिल दशरथ गुंजाळ (४१) या तिघांना हल्ला झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच कुर्डूवाडी पोलीस पथकाने पकडले. त्यांना माढा न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ती संपून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. उर्वरित सर्व आरोपींच्या शोधात गुन्हे शाखेचे पथक, स्थानिक पोलिसांचे पथक व इतर पथके रवाना झाली होती. बुधवारी मध्यरात्री १२ ते १२:३० च्या दरम्यान बारलोणी गावात यातील काही आरोपी फिरत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार या ठिकाणची गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेकडील इतर अधिकारी व कर्मचारी, मुख्यालयाकडील आरसीपी पथक यांच्या संयुक्तरीत्या बारलोणी गावात जाऊन याच गुन्ह्यातील संतोष विनायक गुंजाळ (३०), सुभाष ऊर्फ सुभान रामा गुंजाळ (५५, दोघे रा. बारलोणी) यांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करून कुर्डूवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांना माढा न्यायालयात उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तेलंगणा पोलिसांना हवा असलेला मोस्ट वाँटेड आरोपी ताब्यात
बारलोणीतील पोलीस हल्ला प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. यात तेलंगणा पोलिसांना हवा असलेला मोस्ट वाँटेड आरोपीही गुन्हे शाखेच्या हाती लागलेला आहे. आरोपी सुभाष ऊर्फ सुभान रामा गुंजाळ हा करीमनगर (राज्य तेलंगणा)मधील गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी असून, त्याने त्याच्या इतर साथीदारांसह तिथे दीड किलो चांदी व दोन लाख रुपये रोख असा मुद्देमाल चोरलेला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, श्याम बुवा, स्थानिक गुन्हे शाखेचे ३३ कर्मचारी व पोलीस मुख्यालयाकडील आरसीपी पोलीस पथकाने केली आहे.