काशिनाथ वाघमारे
सोलापूर : आदमापूर येथील बाळूमामाचे दर्शन आटोपून परतणा-या भाविकांची दुचाकी दुभाजकावर आदळून दोन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर नातेवाइकांनी तिकडे धाव घेतली. विशाल लक्ष्मण कटाप (वय २६, रा. स्वामी विवेकानंदनगर, हत्तुरे वस्ती, सोलापूर) व बसवराज धानाप्पा गौडरू (वय २९, रा. नई जिंदगी, सिद्धेश्वरनगर, सोलापूर) असे अपघातात मरण पावलेल्या दोघांची नावे असून रविवारी सायंकाळी ५:१५ च्या सुमारास मिरज- सांगोला महामार्गावर काळूबाळूवाडी पुलावर हा अपघात झाला. या अपघातात शांतेश्वर सूर्यकांत शिरोळे (वय ३७, रा. स्वामी विवेकानंदनगर, हत्तुरे वस्ती, सोलापूर) हा जखमी झाला. त्याच्यावर सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत दीपक सूर्यकांत शिरोळे (रा. हत्तुरे वस्ती) यांनी फिर्याद दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात तपास करीत आहेत.शांतेश्वर शिरोळे, बसवराज गौडरू व विशाल कटाप हे तिघे जण दुचाकी (एम एच- १३- बी डब्ल्यू -७५३४) ने, तर सागर विठ्ठल पवार व दीपक सूर्यकांत शिरोळे हे दोघेजण (एम. एच. १३/ बी. एस.८३५६) या दुचाकीने शनिवारी रात्री १२ च्या सुमारास सोलापूर येथून निघाले. अमावास्येनिमित्त श्रीक्षेत्र आदमापूर येथील बाळूमामाचे दर्शन घेतले. रविवारी देवदर्शन आटोपून दुपारी १२ च्या सुमारास पाचही जण मिळून परत त्याच दोन दुचाकींवरून सोलापूरकडे मिरजमार्गे सांगोल्याच्या दिशेने निघाले होते. सायं ५.१५ च्या सुमारास त्यांची दुचाकी जुनोनीजवळ काळूबाळूवाडी पुलाच्या दुभाजकाला जोरात धडकली.
या अपघातात विशाल कटाप हा दुचाकीवरून उडून खाली सर्व्हिस रोडवर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेला बसवराज गौडरू याच्याही डोक्याला मार लागून तोही जागीच ठार झाला. मात्र, शांतेश्वर शिरोळे हा तेथेच रस्त्यावर पडून जखमी झाला. दरम्यान, दुचाकी दुभाजकावर आदळून मोठा आवाज झाला अन् पुढे थोड्या अंतरावर असलेला दीपक शिरोळे हा पाठीमागे वळून आला. त्यांनी १०८ रुग्णवाहिका बोलावून घेतली. जखमी शांतेश्वरला उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात हलवले.