सोलापूर : टेंभुर्णी येथील कुर्डूवाडी चौकाजवळील रस्त्यावर वाहन आडऊन लूटमार करणाऱ्या इंदापूरच्या दोघांना अटक करण्यात आली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांकडून नऊ लाख २३ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
अभिजीत उर्फ सोनू महादेव खबाळे (वय २४ रा. आट निमगाव ता. इंदापूर जि. पुणे), गणेश बबन पवार (वय २५ रा. सरडेवाडी, ता. इंदापूर जि. पुणे), योगेश मल्हारी जाधव (वय कंदलगाव ता. इंदापूर जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. प्रशांत विजयकुमार लांडगे (वय २२ रा. नंदा ट्रान्सपोर्ट लिंबीचिंचोळी ता. लोहारा जि. उस्मानाबाद) हा तरुण दि. २८ जून २०२० रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास नवीन कार (क्र. एमएच-१२/एजे-२६०६) हा पुण्याहून उस्मानाबादला जात होता कुर्डुवाडी चौक टेंभुर्णी येथे आला असता अनोळखी तीन चोरटे पल्सर मोटरसायकल वर पाठलाग करत होते. तिघांनी तीन ठिकाणी कार अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश न आल्याने पुन्हा पाठलाग सुरू ठेवला.
प्रशांत लांडगे हा तार घेऊन माढा तालुक्यातील आंबळे याठिकाणी आला असता, तेथे तिघांनी पाठीमागून वेगात येऊन कारच्या पुढे मोटरसायकल आडवी लावून थांबण्यास भाग पाडले. दमदाटी करून तिघांनी कार ताबा घेतला. प्रशांत लांडगे याला वालचंद नगर तालुका इंदापूर येथील निर्जनस्थळी नेऊन त्याच्याजवळील रोख रक्कम मोबाईल व काल ९ लाख २३ हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने नेला होता. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
तपास घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत, सर्जेराव पाटील यांना माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टेंभुर्णी येथील गाणी सरदार ढाबा येथे थांबलेल्या दोघात चोरट्याला ताब्यात घेतले. दोघांकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी नसल्याचे सांगितले. अधिक माहिती घेतली असता त्यांनी कार मोबाइल व रोख रक्कम चोरी असल्याचे सांगितले. यातील अभिजीत खबाळे, योगेश जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे. योगेश जाधव हा एका गुन्ह्यांमध्ये सध्या कारागृहात आहे.