सोलापूर : शहरात घरफोड्या, दुचाकींबरोबरच बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगून त्याची विक्री करण्याच्या प्रकारास पायबंद घालण्यासाठी पोलिसांची शोधमोहीम सुरु आहे. रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास खबऱ्यानं दिलेल्या टीपनुसार सापळा लावून एका तरुणाला सुनील नगर पाण्याच्या टाकीजवळ पकडण्यात आले. त्याच्याकडून परदेशी बनावटीचे दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा २ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घातक शस्त्रांच्या खरेदी-विक्री संदर्भातील गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख फौजदार विक्रम देशमूख यांच्या पथकास आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी नेहमीप्रमाणे पथकाची चोरट्यांच्या विरोधात शोधमोहीम सुरु होती. रविवारी रात्रीच्या सुमारास खबऱ्याच्या टीपनुसार एक तरुण सुनील नगर पाण्याच्या टाकीजवळ परदेशी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी येत असल्याचे समजले.
पथकाने तातडीने सुनील नगर येथे पोहचून सापळा लावला. काही वेळाने एक तरुण मध्यरात्री एकच्या सुमारास पिशवी घेऊन चालत येत असल्याचे समजले. हवालदार याडगी यांनी त्याला हटकताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. तेव्ही डीबी पथकातील अंमलदारांनी त्याला झडप घालून पकडले. त्याची तपासणी केली असता त्याच्या कमरेला लावलेले आणि कापडी पिशवीतील असे दोन परदेशी बनावटीची पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे आढळली. हा एकूण २ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याने आपले नाव सुनील लक्ष्मीकांत अकोले (वय- ३०, रा. ४३, सुनील नगर, एमआयडीसी सोलापूर) असे सांगितले.पिस्टल इंदापूरहून सोलापुरात विक्रीसाठी आणलेसदर आरोपीने दोन पिस्टल इंदापूर येथील एका आरोपीकडून विक्रीसाठी सोलापुरात आणल्याची कबुली अटक केलेल्या आरोपीने दिली. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी, जेलरोड, जोडभावी पोलीस ठाण्यात घरफोडी, जबरी चोरी अशा प्रकारचे १३ गुन्हे दाखल आहेत. २०१३ पासून तो पोलिसांच्या रेकार्डवर आहे.