सोलापूर : यापूर्वी कोरोना रुग्ण आढळलेल्या बापूजी नगरातील दोन रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळले आहेत. सोलापुरात सारी च्या आजाराने एका सत्तर वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापुरात कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची एकूण संख्या ४१ झाली आहे. यातील तीन जण मरण पावले तर 38 जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. शुक्रवारी दुपारपासून २७ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत शहरात संचारबंदीचा कडक अंमल असेल. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर कोणालाही रस्त्यावर येता येणार नाही. त्याचप्रमाणे जिल्हा व तालुकाबंदीचा अंमल कडकपणे करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच बसावे. कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये. सर्दी, थंडीताप खोकला असा त्रास होत असेल तर जवळचे सरकारी दवाखाना किंवा शासकीय रुग्णालयातील फिव्हर कक्षात उपचारासाठी दाखल व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे शहरातील घरोघरी सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे. सर्वेक्षणाचे कर्मचारी जेव्हा आपल्याकडे घरी येतील तेव्हा त्यांना कुटुंंबातील सर्व माहिती द्यावी. बाहेरगावाहून आलेल्यांबाबत स्वत:हून माहिती पुरवावी. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सोपे होणार आहे.
प्रतिबंधीत केलेल्या दहा ठिकाणचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहेत. त्या ठिकाणाहून पॉझीटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करण्यात आली आहे. अहवाल येईल तसे त्यांच्याबाबत निर्णय घेतले जाणार आहेत.