संदीप लोणकर
सोलापूर/श्रीपूर : कोंढारपट्टा नेवरे तालुका माळशिरस येथील हरिदास बाबर यांच्या दोन्ही कन्या कौशल्या हरिदास बाबर व अंजली हरिदास बाबर या दोघींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. त्या दोघी कोंढारपट्टा गावचे माजी सरपंच तात्यासाहेब बाबर यांच्या बहिणी आहेत.
अंजली बाबर हिने महाराष्ट्रामध्ये मुलीमधून ४०८ गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला आहे. अंजली बाबर हिने उच्च शिक्षण घेण्यासाठी बारामती येथे अकरावी, बारावी शिक्षण घेतले आणि त्यानंतर पुणे येथे मॉडर्न कॉलेज येथे बीसीएस केले, तर कौशल्या बाबर हिने शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय माळेवाडी अकलूज येथे अकरावी, बारावी शिक्षण घेतले. त्यानंतर मेथवडे येथे बी फार्मसी केले. त्यानंतर बारामती माळेगाव येथे एम फार्मसी केले व त्यानंतर अंजली व कौशल्या हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. सात वर्षे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास करून यावर्षी दोघी बहिणींनी पोलिस उपनिरीक्षक बनल्या आहेत.
हरिदासांची सूनही कृषी उपसंचालक
हरिदास बाबर या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक मुलगा व तीन मुली असे सर्वच अधिकारी झाले. कोंढारपट्टा येथील हरिदास बाबर हे शेतकरी एकत्रित कुटुंबात राहतात. त्यांची या अगोदरची मुलगी भावना बाबर या कृषी अधिकारी म्हणून पुणे येथे कार्यरत आहेत. दुसरा मुलगा कृष्णा बाबर हेही कृषी अधिकारी असून तो कोल्हापूर येथे कार्यरत आहे, त्याची पत्नी प्रणाली कृष्णा बाबर ही गोंदिया येथे कृषी उपसंचालक (वर्ग एक) या पदावर कार्यरत आहे. आता कौशल्या व अंजली बाबर या दोन मुली एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले असून आता हरिदास बाबर यांच्या कुटुंबातील सर्वच मुले अधिकारी बनले आहेत.