सोलापूर : पंढरपूर येथे कार्तिक यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून व इतर राज्यांतून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येतात. या यात्रेच्या काळातील गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनाने आदिलाबाद - पंढरपूर, नांदेड - पंढरपूर स्पेशल एक्स्प्रेस विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्रवाशाकडे कन्फर्म तिकीट असेल त्यांनाच गाडीत प्रवेश मिळेल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, ही गाडी १४ नोव्हेंबर २०२१ ला धावणार आहे. ही गाडी आदिलाबाद स्थानकावरून रविवार १४ नोव्हेंबर रोजी सुटणार असून सोमवार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पंढरपूर स्थानकावर पोहोचणार आहे. परत पंढरपूर स्थानकावरून ही गाडी ११.१० वाजता सुटणार असून नांदेड स्थानकावर रात्री ११.३० वाजता पोहोचणार आहे. नांदेड-पंढरपूर स्पेशल एक्स्प्रेस १८ नोव्हेंबरपासून धावणार आहे. या गाडीला जनरल ६, एसी थ्री टियर १, स्लिपर ११, ब्रेकयान २ असे एकूण २० कोचेस असणार आहेत. या गाडीचे आरक्षण १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या गाडीला विशेष चार्ज आकारले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.