सोलापूर: लहान बालकांमध्ये होणाऱ्या गोवर आजाराचे दोन संशयित रूग्ण रूग्ण म्हणून आढळून आले आहेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यातील एकाला उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर दुसऱ्या रूग्णावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
सोलापूर महापालिका आरोग्य विभागाची बैठक झाली. या बैठकीत गोवर आजाराला प्रतिबंध करण्यासंदर्भात उपाययोजना व कार्यक्रम ठरविण्यात आला. संशयित रूग्ण आढळून आल्यास संबंधित रूग्णास नागरी आरोग्य सेवा केंद्रात उपचार केले जात आहेत. लक्षणे गंभीर आढळून आल्यास त्याच्यावर शासकीय रूग्णालयात उपचाराची सोय करण्यात आली आहे.
० ते ५ वयोगटातील मुलांचे होणार सर्वेक्षण -शहरातील ० ते ५ वर्षातील मुलांचे येत्या १० दिवसात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात मुलांची माहिती गोळा करून संबंधित मुलांना गोवर / रूबेला लस देण्यात येणार आहे. पूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ० ते २ वर्षाच्या मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते, त्यांचे ९० टक्के लसीकरणही करण्यात आले होते, उर्वरित मुलांना लसीकरण करण्यात येत आहे.
अशी घ्यावी काळजी... -- प्रथमत - पालकांनी गोवर आजाराबाबत भीती बाळगू नये.- प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला गोवर / रूबेलाचे लसीकरण करून घ्यावे.- लस दिल्यास आजार टाळू शकतो, जन्मापासून होणारे आजारही टाळता येतात.
ही आहेत लक्षणे -- ताप, सर्दी, खोकला- अंगावर पुरळ येणे, अंग लाल होणे- अंग सतत खाजविणे
शहरात अद्याप तरी गोवरची साथ नाही. एका भागात एकाच वेळी सात व त्यापेक्षा अधिक रूग्ण आढळले तरच साथरोग म्हणता येते. शहरात फक्त दोन संशयित रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी एकाला उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला असून एकावर उपचार सुरू आहेत. गोवर आजार झाल्यावर पालकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. आजारापासून दूर राहण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे.
- डॉ. बसवराज लोहारे, आरोग्य अधिकारी, मनपा.