सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला कार्याध्यक्षाच्या गळ्यातील तीन तोळ्याचे मंगळसूत्र मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी पळविल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी दोन संशयितांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे. वैशाली गुंड (४१, रा. ब्लॉक नं. २२/२३ कोटणीसनगर, विजापूररोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय जीवन जोकारे (वय २५, रा. जयकुमारनगर,विजापूर रोड सोलापूर), संकेत शामसुंदर प्रतिनिधी (२३, रा. ८४ नरेंद्रनगर सैफुल) या दोघा संशयिताविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंड या मुलगी समृद्धीसह ९ मे रोजी रात्री सव्वादहा वाजता विजापूर महामार्गावरून कोटणीसनगरच्या वळणावर पनाश अपार्टमेंटच्यासमोरुन स्कुटरवरून घराकडे निघाल्या होत्या. वळणावर पाठीमागून मोटर सायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेल्याने अचानकपणे गळ्यात हात घालून गंठण हिसकावले.या प्रकाराने त्या सावध झाल्या. त्यांनी आरडाओरडा केला पण चोरटे पसार झाले. घटनेनंतर त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. पण पोलीस हलले नाहीत. ना त्यांच्या मदतीला महिला पथक आले ना स्थानिक पोलीस. घटनेबाबत फिर्याद देण्यासाठी त्या पोलीस ठाण्यात गेल्या. फिर्याद दाखल करण्यासाठी त्यांना मध्यरात्रीचे एक वाजले. गुंड यांनी केलेल्या वर्णनावरून मध्यरात्री एकच्या सुमाराला दोन संशयितांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांची चौकशी करून, अटक केली आहे.तपास फौजदार अमर पाटील करीत आहेत.(प्रतिनिधी) आठवड्यात नऊ घटना घडल्या प्रकाराबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी पोलीस आयुक्तांना फोन करून नाराजी व्यक्त केली. आठवड्यात मंगळसूत्र चोरीच्या ९ घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.